कर्जत : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांचा महापूर लोटला होता. नवरात्रापा
कर्जत : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांचा महापूर लोटला होता. नवरात्रापासून वाढत चाललेला भाविकांचा ओघ पालखी उत्सवातही पहावयास मिळाला. विजयादशमीच्या रात्री राहुल रावसाहेब जगताप यांनी फुलाचा मान देऊन बाहेर पडलेल्या पालखीच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच राज्याच्या विविध भागातील भाविकांनी हजेरी लावली.
माहूरची रेणुकामाता व तुळजापूरची तुळजाभवानी या शक्तिपीठांचे ठाणे असलेल्या कुळधरण नगरीत जगदंबा देवीचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात झाला. आई भवानीचा जयघोष करत दसर्याच्या रात्री बारा वाजता देवीची पालखी बाहेर निघाली. हजारो भाविक भक्तांनी मंदिराबाहेरच्या प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे स्वागत केले. पालखीचा कल, छत्री, पूजा आदी मान गावातील जगताप, सुपेकर, गुंड, पवार, आजबे, शिंदे, लहाडे, गजरमल, भवाळ आदी कुटुंबीयांकडे आहेत. त्यानुसार पालखीचा कल, छत्री धरणे, आरती करणे आदींचे नियोजन करण्यात आले होते. या उत्सवात देवीची पालखी गावातील लोकांच्या दारादारात नेण्यात आली. विविध कुटुंबीयांकडून ठीकठिकाणी देवीची आरती करून दर्शन घेण्यात आले. दुपारी पालखी देवीचे माहेर घर असलेल्या जगताप वाड्यात नेण्यात आली. तेथे साडीचोळीने ओटी भरून भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांना पेढे तसेच फळांचे वाटप करण्यात आले. या पालखी महोत्सवात कुळधरण तसेच पंचक्रोशीतील धालवडी, सुपेकरवाडी, गुंडाचीवाडी, दुरगाव, कोपर्डी आदी गावातील तरुण मंडळांनी सादर केलेल्या लेझीम डावांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पालखी मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर मानाचे वाटप करण्यात आले. नवरात्र तसेच दसरा उत्सवात कर्जत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS