Homeमहाराष्ट्रअहमदनगर

राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात २०२५ हे वर्ष गुन्हेगारीच्या रक्तरंजित आणि भयावह छायेत गेले. गुन्हेगार बिनधास्त झाले, अवैध धंदे फोफावले आणि सर्वस

गोव्यात दोन रशियन महिलांची हत्या
मैत्रिणींचे फोटो प्रियकरास पाठवणार्‍या तरूणीवर गुन्हा
माहेराकडून घर बांधण्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याने उपाशी ठेवून, बाळासहित घराबाहेर हाकलले

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात २०२५ हे वर्ष गुन्हेगारीच्या रक्तरंजित आणि भयावह छायेत गेले. गुन्हेगार बिनधास्त झाले, अवैध धंदे फोफावले आणि सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली जगू लागले. कायदा राखण्याची जबाबदारी असलेली पोलिस यंत्रणा मात्र गुन्हे उघडकीस आणण्याच्या आकडेवारीवर समाधान मानताना दिसली.
२०२५ मध्ये राहुरी पोलिस ठाण्यात तब्बल १ हजार २७ गुन्हे दाखल झाले. हा आकडा केवळ कागदावरचा नाही, तर तो तालुक्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा आरसा आहे. राहुरी तालुक्यात २०२५ मध्ये अल्पवयीन ५० मुली पळवून नेल्याच्या घटना समोर आल्या. महिलांवरील अत्याचाराचे ९ गुन्हे, तर विनयभंगाचे तब्बल ७४ गुन्हे दाखल झाले.

 

गुन्हेगारीचा तीन वर्षांचा प्रवास
सन २०२३ मध्ये राहुरी पोलिस ठाण्यात १,०५५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी फक्त ७६३ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला. २०२४ मध्ये पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याने गुन्ह्यांचा आकडा काहीसा कमी झाला. त्या वर्षी ९७८ गुन्हे दाखल होऊन ७३१ गुन्हे उघडकीस आले. मात्र २०२५ मध्ये गुन्हेगारीने पुन्हा उसळी घेत १,०२७ गुन्ह्यांचा टप्पा ओलांडला. जरी ८३३ गुन्हे उघडकीस आले असले, पण उरलेले गुन्हे? आरोपी मोकाट असताना नागरिक सुरक्षित कसे राहणार? तरी गुन्हेगारीचा आलेख खाली आणण्यात प्रशासन अपयशी ठरले.


अवैध धंदे : गुन्हेगारीचे खरे मूळ
राहुरी शहर व ग्रामीण भागात वाळू तस्करी, मटका, जुगार अड्डे, गावठी दारू, नशेची औषधे, गावठी कट्टे हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांमधून निर्माण होणाऱ्या आर्थिक ताकदीच्या जोरावर गुन्हेगारांकडून सर्वसामान्यांवर दहशत निर्माण केली जात आहे. परिणामी मारहाण, दमदाटी, लुटमार, घरफोडी, दरोडे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाळू, मुरूम व मातीची तस्करी ही राहुरी तालुक्यातील गंभीर समस्या बनली असून, शासकीय संपत्ती लुटली जात असतानाही कारवाई तोकडी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.


अनोळखी मृतदेह : तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
२०२५ मध्ये बारागाव नांदूर परिसरात प्लास्टिकच्या पिपात सापडलेला मृतदेह, मुळा नदीपात्रातील अनोळखी मृतदेह, तसेच नगर–मनमाड महामार्गावर संशयास्पद स्थितीत आढळलेले मृतदेह अशा १० घटनांतील मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही. हे पोलिस तपासाच्या मर्यादा अधोरेखित करणारे वास्तव आहे.

ऑपरेशन ‘मुस्कान’ : दिलासादायक बाब
गुन्हेगारीच्या अंधारात एक आशेचा किरण ठरले ते ऑपरेशन ‘मुस्कान’. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपहरण झालेल्या ९९ मुलींना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये व सामाजिक कार्यक्रमांतून मुलींच्या सुरक्षिततेबाबत केलेले प्रबोधन स्तुत्य आहे. मात्र गुन्हे घडूच नयेत, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत.


निष्कर्ष
२०२५ मध्ये राहुरी पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले, हे नाकारता येणार नाही. मात्र गुन्हेगारीचा वाढता आलेख, महिलांची असुरक्षितता, अवैध धंद्यांचा सुळसुळाट आणि अपूर्ण तपास या बाबी पाहता, पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. केवळ गुन्हे उघडकीस आणणे पुरेसे नसून, गुन्हे घडण्याआधीच त्यांना आळा घालणे, हीच खरी कसोटी राहुरी पोलिसांसमोर आहे.

COMMENTS