दहिवडी / म्हसवड : ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून अंगणात झोपलेल्या चुलत्यावर धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा

दहिवडी / म्हसवड : ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून अंगणात झोपलेल्या चुलत्यावर धारदार चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 19/05/2020 रोजी पहाटे तीनच्या सुमारास मौजे कारंडेवाडी (कुकडवाड) ता. माण, जि. सातारा येथे लक्ष्मण आण्णा चव्हाण (वय 49, रा. कारंडेवाडी, कुकुडवाड, ता. माण, जि. सातारा यांचे राहत्या घरासमोर आरोपी संदीप वसंत चव्हाण (वय 28, रा. कारंडेवाडी, कुकुडवाड, ता. माण, जि. सातारा) याने त्याचे चुलते लक्ष्मण अण्णा चव्हाण याच्यासोबत ऊसतोडीचे पैशाचे कारणावरून भांडण झाले होते. चुलते लक्ष्मण चव्हाण अंगणात झोपलेले असताना मटन कापण्याच्या सुर्याने गळ्यावर वार केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
गुन्ह्यात सहा. पो. नि. गणेश वाघमोडे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व आरोपी संदीप वसंत चव्हाण कसून तपास करून आरोपींविरुध्द जिल्हा सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी संदीप वसंत चव्हाण याला जन्मठेप शिक्षा व 5000 रूपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणी प्रॉसिक्युशन स्न्वॉड पोलीस उप निरिक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे, अमीर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.
COMMENTS