Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती

सातारा / प्रतिनिधी : वाढत्या उन्हामुळे जंगल क्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले असून, तहानेने व्याकूळ झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्ती

मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
सातारच्या त्रिशंकू भागातील पथदिवे दोन दिवसापासून बंद
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : वाढत्या उन्हामुळे जंगल क्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत चालले असून, तहानेने व्याकूळ झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत घुसत आहेत. त्यातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष निर्माण होत असतो. हा संघर्ष टाळण्यासाठी सातारा वन विभागाने जिल्ह्यातील वन क्षेत्रात 664 कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राखीव, संरक्षित आणि पूर्वापार जतन केलेले वन क्षेत्र आहे. त्यापैकी जावळी, सातारा, पाटण, महाबळेश्‍वर, कराड या तालुक्यांत वनाच्छादित क्षेत्र सर्वाधिक आहे.
या वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, रानगवे, मोर, रानडुकरे, साळींदर, घोरपड आदी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. पावसाळा, हिवाळ्यात या वन्यप्राण्यांना आवश्यक असणारे पाणी, खाद्य वनक्षेत्रात सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने त्यांचा मानवी वस्तीत सहसा शिरकाव होत नाही. उन्हाळा सुरू झाल्यानंतर वनक्षेत्रातील सर्वच जातकुळीतील वन्यप्राण्यांचे खाद्य, पाण्याच्या शोधार्थ स्थलांतर सुरू होते. या स्थलांतरातून वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होतो. हे टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वन विभागाने उन्हाळ्याच्या काळात वन क्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यावर भर दिला आहे. या पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासाजवळच पाणी उपलब्ध होत आहे. सद्यःस्थितीत वन विभागाने 11 वन क्षेत्रात 664 पाणवठे तयार केले आहेत. त्यापैकी तीन पाणवठे नैसर्गिक असून, त्या ठिकाणचे झरे जिवंत, वाहते राहण्यासाठीच्या विशेष उपाययोजना आखल्या आहेत. वन क्षेत्रातील पाणवठ्याची पाणीपातळी तपासण्याची जबाबदारी वन कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गाडी रस्ता आहे. त्या ठिकाणी टँकरच्या मदतीने, दुर्गम भागात दुचाकीवरून 30 लिटर क्षमतेचे पाण्याचे कॅन नेत पाणवठ्याची पाणी पातळी वनरक्षक राखत आहेत.
सातारा शहरालगतच्या वनक्षेत्रात दररोज शेकडो नागरिक सकाळ, संध्याकाळच्या वेळेस फिरण्यास जात असतात. हे नागरिक जाताना सोबत पाण्याच्या भरलेल्या बाटल्या नेतात. या बाटल्यांमधील पाणी ते नागरिक वन क्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये भरत त्यातील पाणीपातळी कायम राखण्याचे काम करत असल्याने अशा नागरिकांची काही प्रमाणात वन विभागास मदत होत आहे.
कास पठार, परळी खोर्‍यात वन्यप्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असून, याठिकाणी वन विभागाने पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमधील पाणीपातळी राखण्याचे काम वनरक्षक करत असून, त्यांच्यावर मर्यादा पडत आहेत. त्यासाठी या परिसरातील पाणवठ्यांची देखभाल, पाणीपातळी कायम राखण्यासाठी त्या परिसरातील ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिकांनी पाणवठे दत्तक घ्यावेत, असे आवाहन सातारचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.
तालुकानिहाय केलेले पाणवठे : मेढा- 43, सातारा- 85, पाटण- 52, कोरेगाव- 85, कराड- 90, फलटण- 50, खंडाळा- 45, वाई- 35, खटाव- 72, महाबळेश्‍वर- 54, दहिवडी- 51.

COMMENTS