नव्या महामहिमांचे अभिनंदन आणि आवाहन !

Homeताज्या बातम्यादेश

नव्या महामहिमांचे अभिनंदन आणि आवाहन !

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाला १६ व्या राष्ट्रपती म्हणून  आदिवासी समुहातीतून द्रौपदी मुर्मू या महिला लाभल्या आहेत. विरोधी उमेद

पुणे शहराची वाटचाल अमली पदार्थांच्या हबकडे
 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न
पूजा टाक-साळुंखे हिने सर केला नागफणी कडा

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाला १६ व्या राष्ट्रपती म्हणून  आदिवासी समुहातीतून द्रौपदी मुर्मू या महिला लाभल्या आहेत. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा दुप्पटीने मते मिळवणाऱ्या नव्या राष्ट्रपतींचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करतो. तसे पाहिले तर सत्ताधारी आघाडी आणि विपक्ष यांच्याकडे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी समसमान मतदार संख्या होती. तरीही, आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा दुप्पटीने मतदान मुर्मू यांनी खेचले. कोणत्याही प्रकारचा व्हीप नसलेल्या या मतदान प्रक्रियेत मुर्मू यांना अधिक मते मिळण्याचे खरे कारण त्या सत्ताधारी आघाडीच्या उमेदवार होत्या, हे नसून; त्यांच्या उमेदवारीमुळे अनेक राजकीय पक्षातील लोक प्रतिनिधींच्या सामाजिक समतेच्या विचारांना आव्हान मिळाले. याचाच परिणाम पक्ष किंवा आघाडीच्या भूमिकेपेक्षा देशाला आदिवासी आणि त्यातही महिला राष्ट्रपती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मिळणे हा एक प्रकारचा सामाजिक न्याय वाटला. परिणामी द्रौपदी मुर्मू यांना ५४० मते मिळाली ज्यांचे एकूण मत मूल्य ३ लाख ७८ हजार असून यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली असून त्यांचे एकूण मत मूल्य १ लाख ४४ हजार सहाशे एवढे आहे. एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार,  एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे. भारताला पंधरावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित समाजातून दुसरे दलित राष्ट्रपती म्हणून ते देशाला लाभले. परंतु, राष्ट्रपती पदावर असताना त्यांची स्वतंत्र कार्यशैली देशाला जाणवली नाही. द्रौपदी मुर्मू यांच्याकडून क्रियाशील राष्ट्रपती असावेत, अशी जनभावना आहे. खरेतर, गेल्या पाच वर्षांच्या काळात आदिवासी समुदायाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी दहा लाख आदिवासी बांधवांना त्यांची मुळ भूमी सोडण्याचा आदेश याच देशाच्या न्यायपालिकेने दिला आहे. हजारों पिढ्या ज्यांच्या निसर्गाच्या कुशीत शेती करण्यात गेल्या आहेत, अशा मुळ रहिवासी असणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या भूमी पासून विभक्तच केले जात नसून त्यांना राहणे आणि जगण्याचा अधिकार नाकारला जात आहे. गुजरात राज्यात जगातील सर्वात उंच आणि भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी चा पुतळा आदिवासी बांधवांना विस्थापित करूनच उभारण्यात आला आहे. त्याच प्रदेशात निर्माण झालेल्या सरदार सरोवर या प्रकल्पग्रस्त आदिवासींचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. त्याचप्रमाणे भारतात इंग्रजही ज्या प्रदेशाला जिंकू शकले नाही, असा डांगचा आदिवासी प्रदेश आज इको झोन म्हणून विस्थापित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला गेला आहे. नव्या महामहिम राष्ट्रपती या संथाल या आदिवासी जमातीतून आहेत. याच जमातीतून क्रांतिकारी बिरसा मुंडा होते. उलगुलान ची हाक देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देणारा लढा लढणारे बिरसा मुंडा वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी फासावर गेले. त्यांच्या क्रांतीकार्याचा इतिहास आजही आदिवासी बांधवांच्या परिवर्तनाच्या चळवळीला गती देत आहे. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी आपली शक्ती लावावी, अशी अपेक्षा करणे गैर नाही. गावपातळीवर सत्तेचा इतिहास असणाऱ्या त्यांच्या कुटूंबाला सत्तेचा अनुभव आहे. नव्या राष्ट्रपतींना शुभेच्छा देताना आदिवासी समाजाच्या वतीने व्यक्त केलेल्या अपेक्षा या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करतीलच, याची आम्हाला खात्री आहे!

COMMENTS