Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद आवश्यक – डॉ. ज्योतीताई मेटे

आश्रय सेवा केंद्राच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

बीड प्रतिनिधी - आज स्पर्धेच्या युगामध्ये एकमेकांमधील संवाद कमी झाला आहे. संवादाची जागा मोबाईल, सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे नवीन पिढी योग्य

जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष
डॉ. विशाल गुंजाळ यांची गव्हरनिंग कॉन्सलिंग पदी नियुक्ति
इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक

बीड प्रतिनिधी – आज स्पर्धेच्या युगामध्ये एकमेकांमधील संवाद कमी झाला आहे. संवादाची जागा मोबाईल, सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे नवीन पिढी योग्य दिशेने घडवायची असेल तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये कायम सुसंवाद असणे गरजेचे आहे, आपला विद्यार्थी नेमका काय करतो हे संवादाशिवाय कळणार नाही. त्यामुळे संवाद हाच त्याचे आयुष्य घडू शकतो असे मत डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी व्यक्त केले. तर आजही स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना नामी संधी आहे. आपली आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात जर आपले करिअर घडवले तर आयुष्यामध्ये खर्‍या अर्थाने यशस्वी होता येते असे मत जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ यांनी व्यक्त केले. तर स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करणे काळाची गरज आहे असे मत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
बीड येथील स.मा. गर्गे भवन येथे दैनिक सूर्योदय, दैनिक समर्थ राजयोग यांच्या सहयोगातून आश्रय सेवा केंद्राच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी मधील 85 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, कोरोना योद्धा मुळे अण्णा फाउंडेशन संस्थापक छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध उद्योजक रमेश अण्णा मुळे, दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, छावा संघटनेचे संस्थापक गंगाधर नानाकाळ काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते चांद खान करीम खान पठाण, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे संस्थापक विनोद अण्णा भोसले, पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आयुब्ब पठाण, सामाजिक कार्यकर्ते रमेश गंगाधरे, शिवसंग्रामचे नेते सुहास पाटील, मनोज जाधव, सचिन कोठुळे, नगरसेवक विलास विधाते, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी शिवलाल राठोड, वादळचे संपादक शेखर कुमार, संचारच्या संपादिका प्रतिभाताई गणोरकर, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष रेहाना पठाण, भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव नवले, पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबा देशमाने,दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, कार्यक्रमाच्या आयोजक आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्ष शेख आयेशा, आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यामागील भूमिका पत्रकार वैभव स्वामी यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले, आजचा गुणवंत विद्यार्थी हा उद्याच्या बलशाली भारताचा उज्वल हिरा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले योगदान देऊन या देशाला,या महाराष्ट्राला घडवण्याचे कार्य करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कायम गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संतोष मानूरकर म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या बीड जिल्ह्याचे नाव मागास जिल्हा हे पुसण्यासाठी अनमोल योगदान द्यावे. यासाठीच या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे विनोद अण्णा भोसले म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. त्यांना स्कुटी व इतर बक्षीस मिळवून देण्यासाठी पोलीस हक्क संरक्षण संघटना कायम पाठीशी राहील अशी घोषणा केली.याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक रमेश अण्णा मुळे म्हणाले, कोणतेही काम आणि क्षेत्र मोठे अथवा लहान नसते तुम्ही ज्याही क्षेत्रात काम करत आहात त्या ठिकाणी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम केल्यास यश निश्चित मिळते. त्यामुळे आपल्या कामाला आणि कर्तुत्वाला संधी द्या असे गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी छावा संघटनेचे संस्थापक तथा दैनिक सूर्योदयाचे संपादक गंगाधर नाना काळकुटे म्हणाले, गुणवंत विद्यार्थी आता बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अधिक प्रमाणात घडत आहेत. ज्या जिल्ह्याकडे गुणवत्तेच्या दृष्टीने खाली पाहून बघण्याची वेळ येत होती ती वेळ गुणवंत विद्यार्थ्यांनी वर ताठ मानेने बघण्याची वेळ आणून बीड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीड जिल्हा प्रगतीपथावर निश्चित जाईल आणि या जिल्ह्याचे मागासले पण पुसले जाईल.त्यामुळेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अँड चंद्रकांत नवले म्हणाले, बीड जिल्ह्यातला विद्यार्थी सचोटीने, अभ्यास करून बीड जिल्ह्याची गुणवत्ता वाढवत आहे हे निश्चित अभिमानास्पद आहे. तर भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव नवले म्हणाले, पालकांनी आपले स्वप्न आणि क्षेत्र आपल्या पाल्यावर लादू नये. आपल्या पाल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात त्याला करिअर घडू देण्यासाठी पालकांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. अनेक वेळा प्रसंग बिकट येईल त्यावेळी आपल्या पाल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. तो निश्चित उद्याचे भविष्य उज्वल करेल. माझा मुलगा सौरभ लहानपणापासून क्रिकेटच्या वेडात होता. त्याला सर्वजण नाव ठेवायचे पण आम्ही पालक त्याच्या पाठीशी उभे राहिलो. आज तो रणजी मध्ये खेळणारा बीड जिल्ह्यातला पहिला खेळाडू ठरला. एवढेच नव्हे आयपीएलच्या धरतीवर होत असलेल्या एम पी एल स्पर्धेमध्ये त्याची निवड महाराष्ट्राच्या संघाकडून झाली आहे. जर आपले प्रेम आणि पाठबळ असेच कायम पाठीशी राहिले तर तो कदाचित उद्या भारताच्या संघामध्ये देखील खेळून बीड जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार वादळचे संपादक शेखर कुमार यांनी मानले. सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत पत्रकार शेख आयेशा, पत्रकार अभिजीत पवार, वर्षा स्वामी यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते बीड जिल्हा भरातून आलेल्या 163 गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यासह सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता झाली.
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करणे काळाची गरज : वसंत मुंडे
विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून गुणवत्ता सिद्ध केली आहे. मात्र हा इथेच टप्पा संपत नाही. तर आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
100 टक्के गुण प्राप्त प्रेम आराकचा विशेष गौरव
इयत्ता 10 मध्ये 100 टक्के गुण प्राप्त प्रेम आराकचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांना लोकमतचा जागतिक पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा ही विशेष गौरव करण्यात आला. आयपीएलच्या धर्तीवर एम पी एल क्रिकेट स्पर्धेत बीडच्या सौरभ शिवाजीराव नवले या क्रिकेटपटूला संधी मिळाल्याने बीड जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्वल झाल्याबद्दल सौरभचे वडील भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव नवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनामध्ये पाली येथील ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रदर्शन करत जिल्हा पातळीवर नाव उंचावल्याबद्दल रेहान शेख रफिक याचाही विशेष सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.तर संपादक वैभव स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.

COMMENTS