Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदुत्ववादी मोर्चापासून शहर भाजप अलिप्त

पोलिसांनी 41जणांना केले तडीपार

अहमदनगर/प्रतिनिधी ः स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणारा भारतीय जनता पक्ष आज बुधवारी (14 डिसेंबर) नगरमध्ये काढण्यात येणार्‍या सकल हिंदू समाजा

ओबीसी आरक्षण बचावासाठी दत्तू सदगीर यांचे उपोषण
वाचन संस्कृतीतर्फे प्रा. विलासराव तुळे यांचा सन्मान
वर्षा सुरासे-साळुंकेंना उत्कृष्ट योग शिक्षिका पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणारा भारतीय जनता पक्ष आज बुधवारी (14 डिसेंबर) नगरमध्ये काढण्यात येणार्‍या सकल हिंदू समाजाच्या मोर्चापासून अलिप्त राहिला आहे. नगर शहर भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेनेही या मोर्चापासून स्वतःला बाजूला ठेवले आहे. दरम्यान, आज निघणार्‍या हिंदुत्ववादी मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर कोतवाली व तोफखाना पोलिसांनी या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मिळून 41जणांना मंगळवार (13 डिसेंबर), आज बुधवार (14 डिसेंबर) व उद्या गुरुवार (15 डिसेंबर) असे तीन दिवस हद्दपार केले आहे. तसेच काहीजणांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँडही लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे.

लव्ह जिहादविरोधी व सक्तीचे धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा सकल हिंदू समाजाच्यावतीने आज बुधवारी 14 डिसेंबर नगरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यप्रदेशमधील कालिचरण महाराज व गुजरातमधील काजल हिंदुस्थानी या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाला नगर शहर शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिव राष्ट्र सेना पक्ष व संभाजी भिडे गुरुजींचे शिव प्रतिष्ठान या संस्थांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणार्‍या भारतीय जनता पक्षाने मात्र या मोर्चाला पाठिंबा दिलेला नाही. या पक्षाचे नेते आ. नितेश राणे यांनी लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायद्यासाठी भाजप आग्रही असून, यासाठी आमदार म्हणून पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे. असे असतानाही या दोन कायद्यांसाठी भाजप पक्ष म्हणून नगरला होणार्‍या मोर्चात सहभागी होणार नाही, याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल या दोन संघटनाही या मोर्चात सहभागी होणार नाही. त्यामुळे तोही चर्चेचा विषय झाला आहे.

काहींचा विरोध, काही अलिप्त – एमआयएम व रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाने हिंदुत्ववादी मोर्चाला स्पष्टपणे विरोध केला असून, यामुळे जातीय तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली आहे आणि या मोर्चाला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे तसेच भाजपसमवेत असलेल्या रिपब्लिकन आठवले गटाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासमवेत जाऊ इच्छिणार्‍या प्रा. जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेशी आघाडी करण्याच्या तयारीत असलेल्या ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही या मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याने व त्यांची अलिप्तता दिसत असल्याने त्यांचा मोर्चास विरोध दिसू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर, हिंदुत्ववाद्यांच्या मोर्चाच्या अनुषंगाने नगर शहरातील राजकीय घडामोडी मात्र चर्चेत आहेत.

पोलिसांनी 41 केले तडीपार – सकल हिंदू समाजाच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मिळून 41जणांना मंगळवारपासून (13 डिसेंबर) तीन दिवसांसाठी तडीपार केले आहे. या सर्वांना नोटीसा बजावून त्यांची जिल्ह्याच्या हद्दीबाहेर रवानगी करण्यात आली आहे. याशिवाय, आणखी काहीजणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, काहीजणांकडून चांगल्या वर्तणुकीची हमी देणारे बाँड लिहून घेतले असल्याचेही सांगण्यात आले.

COMMENTS