नाशिक : संघर्षातच यशाचं गमक असतं. आई-वडिलांचा हा संघर्ष बघतच लहानाचा मोठा झालो. शिक्षणाची दिशा याच परिस्थितीने दाखवली आणि आज मी एका संस्थेचा संस्

नाशिक : संघर्षातच यशाचं गमक असतं. आई-वडिलांचा हा संघर्ष बघतच लहानाचा मोठा झालो. शिक्षणाची दिशा याच परिस्थितीने दाखवली आणि आज मी एका संस्थेचा संस्थापक म्हणून ओळख प्रस्थापित करू शकलो, असे प्रतिपादन मानवधन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक डॉ.प्रकाश कोल्हे यांनी केले. येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘मी मला शोधताना’ या साहित्यकृतीवर त्यांनी हुतात्मा स्मारकात संवाद साधला. सुभाषित प्रकाशनचे प्रकाशक सुभाष सबनीस अध्यक्षस्थानी होते.
डॉ कोल्हे पुढे म्हणाले की, आई ही आपला पहिला गुरू असतो. पुढे मी जे काही शिकलो ते निसर्ग आणि माणसाकडून शिकलो. अठराविश्व दारिद्र्य बालपणापासूनच पाहिले आहे, असे सांगत त्यांनी आपला आजपर्यंतचा प्रवास मांडला. ते म्हणाले की, निबंधलेखन हा माझा आवडता विषय होता. इयत्ता अकरावीत असताना माहेरची साडी या चित्रपटापासून प्रेरणा घेत सामाजिक विषयावर लिहायला लागलो. पुढे नोकरीच्या निमित्ताने भारतभर फिरलो. त्यात असंख्य माणसं भेटली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्या बळावर शिक्षण, पत्रकारिता, लेखन आदी क्षेत्रांतही यश मिळवले. मात्र संपत्ती मिळविण्यापेक्षा माणसं जोडणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. याच मानवधनाचा संचय आपण केला पाहिजे. वाचन संस्कृतीला बळ देण्याचा विचार ‘मी मला शोधताना’ यात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रा.सुमती पवार आणि योगेश जाधव या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सूत्रसंचालन सावळीराम तिदमे यांनी केले.आभार अजित कुलकर्णी यांनी मानले. दरम्यान, या उपक्रमात येत्या मंगळवारी (दि.२जुलै) डॉ.राजेंद्र मालोसे हे ‘जगणं-वाचणं’ या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.
COMMENTS