पुणे ः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे संशयाचे वाता

पुणे ः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सक्रिय झाली असून प्रकरणाचा तपास करणार्या गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीची भूमिका तपासण्यासाठी कंपनीचे मालक आर. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी ते पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात हजर झाले. चौकशीदरम्यान अधिकार्यांकडून त्यांना या दुर्घटनेबाबत तसेच अलीकडे करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भात त्यांची चौकशी केल्याचे समजते.
दरम्यान, या प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमधून काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर कंपनी आणि नागरी उड्डाण नियामक संस्थेकडून काही माहिती लपवली जात असल्याचा संशय आहे. त्यांच्या या भूमिकेला अजित पवार गटातील काही आमदारांनीही पाठिंबा दिल्याने प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली होती. विमान दुर्घटनेनंतर आर. के. सिंग यांनी कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी या विषयावर फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, रोहित पवार यांनी विमानाचा वैमानिक शेवटच्या क्षणी बदलण्यात आला, विमानात अपेक्षेपेक्षा अधिक इंधन साठवले होते आणि दुर्घटनेमागे हेतुपुरस्सर कारण असू शकते, असे आरोप केले होते. तसेच या प्रकरणात काही संबंधित व्यक्तींची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीत आर. के. सिंग यांनी नेमके कोणते स्पष्टीकरण दिले, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

COMMENTS