भारताच्या शेजारी असणार्या चीन हा देश सातत्याने कुरापती काढतांना दिसून येत आहे. कुरापती काढण्यामागे चीनचे उद्योग अनेक आहेत. सीमारेषेवर सैन्य तैना
भारताच्या शेजारी असणार्या चीन हा देश सातत्याने कुरापती काढतांना दिसून येत आहे. कुरापती काढण्यामागे चीनचे उद्योग अनेक आहेत. सीमारेषेवर सैन्य तैनात करून, आपल्या महत्वाकांक्षा जागृत करायच्या तर, कधी तिबेट प्रश्न उकरून काढत, तिबेट ताब्यात घेण्याच्या वल्गना करायच्या. यातून चीन आपल्या देशातील जनतेला आम्ही किती देशभिमानी आहोत, आमचे राष्ट्रीयत्व, राष्ट्रभिमान कसा जागृत आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यातून चीनच्या महत्वाच्या प्रश्नांवरून नागरिकांचे दुर्लक्ष करण्यास मदत मिळते. शिवाय आपल्या कुरापतीमुळे शेजारी देश सावध होतात, आणि त्यांच्यावर आपले दडपण राहते, अशीच काहीशी वितंडवादाची चीनची भूमिका सातत्याने राहिली आहे. चीन हा देश पाकिस्तानसारखाच असून, या देशावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. कालच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-केंद्रीत वेस्टर्न थिएटर कमांडसाठी राखीव फॉर्मेशन म्हणून आणखी 3 सशस्त्र ब्रिगेड तैनात केले आहेत. यापैकी एक ब्रिगेड सिक्कीममध्ये तर दुसरी अरुणाचल प्रदेशात तैनात करण्यात आली आहे. एलएसीवर उणे 40 अंश तापमानात सुरु असलेल्या चीनच्या कुरापतींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र भारतासारखा शांत देश शेजारी असल्यामुळे चीनने निवांत राहण्याची खरी गरज आहे. मात्र चीन हा तसा देश नाही. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी-चीनी भाई-भाई असा नारा दिला होता. मात्र चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसत युद्ध पुकारले होते. विशेष म्हणजे 1962 मध्ये भारताची आर्थिक, राजकीय जडणघडण सुरु होती. शस्त्रास्त्राच्या बाबतीत आपण कमकुवत असतांना, चीनने हल्ला केला. त्यानंतर वेळोवेळी चीनने भारतीय सीमेवर आगळीक केली आहे. चीनच्या ताब्यात असलेल्या अक्साई चीनमध्ये पीएलए पूर्णपणे तैनात आहे. सैन्याच्या दोन तुकड्या आणि त्यांच्या रॉकेट, आर्मर, तोफखाना आणि क्षेपणास्त्र सपोर्ट रेजिमेंटसह एक सीमा रक्षक विभाग आहे. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पीपल्स लिबरेशन आर्मी आपली वेस्टर्न थिएटर कमांड मजबूत करत आहे. पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडकडे भारताच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पीएलएने अरुणाचल प्रदेशात 2 संयुक्त सशस्त्र ब्रिगेड आणि चीन-भूतान सीमेजवळ सिलीगुडी कॉरिडॉरजवळ राखीव म्हणून दुसरी ब्रिगेड तैनात केली आहे. याचबरोबर चीन या सीमारेषेच्या भागात रस्ते तयार करतांना दिसून येत आहे. उद्या युद्ध झाल्यास या संसाधनांचा वापर करता येईल, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे चीनवर जास्त विश्वास ठेवता येणार नाही. भारताने नेहमीच चीनसोबत संवाद साधण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भारताने नेहमीच भर दिला, मात्र चीनने एकीकडे संवाद साधायचा आणि दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसायचा, अशीच त्यांचे धोरण दिसून आले आहे. सार्वभौमत्वाचा आदर करणे आणि प्रादेशिक अखंडत्वाचा आदर करणे ही आंतरराष्ट्रीय संबंधांची मूलभूत तत्त्वे आहेत, आणि ती जोडणी आर्थिक व्यवहार्यता आणि वित्तीय जबाबदारीवर आधारित असणे आवश्यक आहे. त्यासाठीच पंडित नेहरूंनी पंचशील तत्वाचा करार केला होता. मात्र चीनने हा करार ही तत्वे नेहमीच पायदळी तुडवली. चीनला भारतातून कोटयावधी रुपयांचा महसूल मिळतो. कारण चीनी उत्पादने भारतात मोठया प्रमाणावर विकली जातात. भारताने जर मनात आणले, आणि चिनी उत्पादनावर बंदी लादली, तरी देखील चीनची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ शकती, इतका मोठा पसारा या उत्पादनाचा भारतात पसरलेला आहे. त्यामुळे चीनने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे, त्यांच्याच हिताचे आहे.
COMMENTS