Homeताज्या बातम्यासंपादकीय

चीनचा पुन्हा कांगावा

चीनने कितीही विषारी फुत्कार सोडले तरी, भारत ते मुकाट्याने सोसेल, असे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. भारत चीनला ठणकावून सांगू शकतो, आणि चोख प्रतिउत

पुन्हा कोरोनाचे सावट
बँकिंग व्यवस्थेसमोरील आव्हाने
आश्‍वासनांची खैरात आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे

चीनने कितीही विषारी फुत्कार सोडले तरी, भारत ते मुकाट्याने सोसेल, असे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. भारत चीनला ठणकावून सांगू शकतो, आणि चोख प्रतिउत्तर देवू शकतो, याची जाणीव चीनला झालेली आहे. तरी देखील चीन आपली चाल सोडतांना दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. या दौर्‍यावर चीनने आक्षेप घेतला आहे. अरूणाचल प्रदेश दौरा म्हणजे आमच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लघंन असल्याची आगळीक चीनने केली आहे. विशेष म्हणजे, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे देशातील प्रमुख नेत्याने आपल्या भूप्रदेशातील कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणे गैर नाही. मात्र चीनचे दुखणे म्हणजे, भारताने या सीमाप्रातांत कोणतीही विकासकामे करू नये, असा त्यांचा होरा आहे. जेणेकरून चीनला या प्रांतात कारवाया करणे सोपे जाते. मात्र ईशान्येकडील भागात विकास आता मोठ्या प्रमाणावर होत असल्यमुळे चीनला ते खुपतांना दिसून येत आहे. त्यामुळे चीनने या दौर्‍यावर आक्षेप घेतला आहे.

चीन सरकारने कायमच भारतीय नेत्यांच्या किंवा अधिकार्‍यांच्या अरुणाचल भेटीचा कडाडून विरोध केला आहे. कारण, त्यामुळे चीनच्या प्रदेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन होते, सीमाक्षेत्राच्या स्थिरतेला धक्का लागतो, तसेच, संबंधित द्विपक्षीय कराराचेही उल्लंघन होते. त्यामुळे भारताने भविष्यात सीमाप्रश्‍नी गुंतागुंत निर्माण होईल, अशा कृती करू नयेत,’ अशी पोकळ धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंज शुआंग यांनी दिली. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्येही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौर्‍यावरही टीका केली होती. त्यामुळे चीनच्या या पोकळ धमक्यांना भारत भीक घालत नाही. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला चांगलेच फटकारले आहे. मात्र चीनचे हे विषारी फुत्कार अरुणाचल, लडाख सीमाभागात नेहमीच दिसून येतात. त्याचबरोबर भारताच्या भूमीत दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकला प्रोत्साहन देणे, त्यांना शस्त्रास्त्र देणे, या बाबींना नेहमीच चीन प्रोत्साहन देत आला आहे. भारताने अलीकडच्या काही वर्षांमध्ये चीनच्या सैन्याला चांगलीच छोबीपछाड दिली आहे.

त्यामुळे एव्हाना चीनला भारताच्या ताकदीची आणि सामर्थ्यांची जाणीव झाली आहे. कारण 1962 नंतर आर्थिक, सांस्कृतिक, परराष्ट्रीय, राजकीय पातळीवर बर्‍याच उलथापालथी झाल्या असून, भारताने मोठी झेप घेतली आहे. भारत 1947 मध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला नव्याने उभे करण्याचे मोठे आव्हान तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर उभे होते. भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे, उद्योगधंद्यांची उभारणी करणे, नवे तंत्रज्ञान विकसित करणे, अशी अनेक आव्हाने उभी असतांना चीनने भारतातवर 1962 मध्ये युद्ध पुकारले. यात भारताचा दारूण पराभव झाला. मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत भारताने कधीही मागे फिरून पाहिले नाही. भारताने संरक्षणदृष्टया नेहमीच स्वतःला सज्ज ठेवले आहे. चीन हे एकमेव कम्युनिस्ट राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर शिल्लक राहिले आहे. असे असतांना, चीनची कुरघोडी करण्याची सवय, त्यांचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानसारख्या दहशतवाद पोसणा-या देशास चीनची मिळत असलेली साथ हे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे लक्षण म्हणावे लागेल. आणि चीनच्या संगतीचे गंभीर परिणाम आज पाकिस्तान भोगतांना दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये आज दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी तेथील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो. याचे प्रमुख कारणे म्हणजे दहशतवाद्यांना आश्रय देणे, चीनकडून नको असतांना देखील भरमसाठ कर्जे घेणे, या कारणामुळे पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरटयावर आहे. अशावेळी चीनने शहाणे होवून, भारतासारख्या शांतताप्रिय देशासोबत आगळीक थांबवण्याची गरज आहे. 

COMMENTS