नवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-केंद्रीत वेस्टर्न थिएटर कमांडसाठी राखीव फॉर्मेशन म्
नवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-केंद्रीत वेस्टर्न थिएटर कमांडसाठी राखीव फॉर्मेशन म्हणून आणखी 3 सशस्त्र ब्रिगेड तैनात केले आहेत. यापैकी एक ब्रिगेड सिक्कीममध्ये तर दुसरी अरुणाचल प्रदेशात तैनात करण्यात आली आहे. एलएसीवर उणे 40 अंश तापमानात सुरु असलेल्या चीनच्या कुरापतींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच चीनने कसलीही आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य व हवाई दल सज्ज ठेवण्यात आले.
चीनच्या ताब्यात असलेल्या अक्साई चीनमध्ये पीएलए पूर्णपणे तैनात आहे. सैन्याच्या दोन तुकड्या आणि त्यांच्या रॉकेट, आर्मर, तोफखाना आणि क्षेपणास्त्र सपोर्ट रेजिमेंटसह एक सीमा रक्षक विभाग आहे. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पीपल्स लिबरेशन आर्मी आपली वेस्टर्न थिएटर कमांड मजबूत करत आहे. पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडकडे भारताच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पीएलएने अरुणाचल प्रदेशात 2 संयुक्त सशस्त्र ब्रिगेड आणि चीन-भूतान सीमेजवळ सिलीगुडी कॉरिडॉरजवळ राखीव म्हणून दुसरी ब्रिगेड तैनात केली आहे. या तीन ब्रिगेडचा चीनी सैन्याच्या पूर्व आणि दक्षिणी थिएटर कमांडमधून वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये समावेश करण्यात आला. पीएलएकडे प्रत्येक ब्रिगेडमध्ये सुमारे 4 हजार 500 सैनिक आहेत. भारतीय सैन्याच्या एका अधिकार्याने सांगितले की, हिवाळा सुरू झाल्याने, पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांड आणि राखीव म्हणून आणलेल्या 3 संयुक्त सशस्त्र ब्रिगेडच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या चिनी ब्रिगेड्स त्यांच्या तळांवर परत जातील की वेस्टर्न थिएटर कमांडच्या खोल भागात तैनात होतील यावरही भारत लक्ष ठेवून आहे. भारत चीनसोबत कमांडर स्तरावरील लष्करी चर्चेच्या 17 व्या फेरीची वाट पाहत आहे, ज्यामध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो.
COMMENTS