अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या संयोजनाची जबाबद

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेकडे देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेवर बालरंगभूमी परिषदेने अतिक्रमण केले असून, स्पर्धा हायजॅक करण्यासाठी बालरंगभूमी परिषदेकडून सांस्कृतिक कार्य संचालनालयावर दबाव टाकण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागासह समांतर रंगभूमी कलावंतांच्या काही संघटनांनी केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धेचे सुरळीतपणे आयोजन होत असताना आणि स्पर्धेच्या संयोजनासाठी सरकारकडे सक्षम यंत्रणा असताना बालनाट्य स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी बाहेरील संस्थेला देण्यात येत असल्याने रंगकर्मीनी नाराजी व्यक्त केली आहे.
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसह बालकलाकारांसाठी बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रत्येक केंद्रावर समन्वयकाची नेमणूक केली जाते. या समन्वयकांवर सरकारच्या सर्व राज्य नाट्य स्पर्धांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी असते. मात्र, यावेळी राज्य शासनाने बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या स्थानिक समन्वयासाठी बालरंगभूमी शाखा समन्वयक म्हणून काम करेल, असा निर्णय एका पत्रातून जाहीर केला आहे. बालरंगभूमी परिषदेने केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात येत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. समन्वयासह बालरंगभूमी परिषदेमार्फत शिफारस करण्यात आलेल्या परीक्षकांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचेही यात म्हटले आहे. यासह स्थानिक बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांना बालनाट्य स्पर्धेला आमंत्रित करणे, तसेच बालनाट्य शिबिराचे संयोजन बालरंगभूमी परिषदेमार्फत करण्याचा निर्णयही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची सक्षम यंत्रणा असताना स्पर्धेचे आयोजन अशा अन्य संस्थेकडे देण्याबाबत रंगकर्मींनी आक्षेप नोंदवला आहे. राज्यात अनेक नाट्य संस्था कार्यरत असून, त्यांच्याकडे स्पर्धेच्या संयोजनाचा सशक्त अनुभव आहे. सरकार आपल्या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी अन्य संस्थेला देणार असेल तर सर्व पात्र संस्थांना समान संधी दिली जावी आणि शिबिर आयोजन, परीक्षक नियुक्ती व समन्वयासाठी स्वतंत्र समिती आवश्यक असल्याची मागणी रंगकर्मीनी केली. बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के – सामंत या आहेत. असे असताना सरकारच्या एका स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी या संस्थेकडे अचानकपणे दिली जाणे अयोग्य असल्याचे मत काही रंगकर्मींनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.
बालरंगभूमी परिषदेचे अनेक पदाधिकारी व सदस्य हे बालनाट्य स्पर्धेत लेखक, दिग्दर्शक व तंत्रज्ञ म्हणून सहभागी असतात. असे असताना या स्पर्धेत बाल रंगभूमीची शिफारस असलेले समन्वयक, परिक्षक व स्टेजवर निमंत्रित असणे ही बाब स्पर्धेच्या नीती व धोरणांच्या विरोधी आहे. यांतुन गैरप्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक पातळीवर अनेकदा स्पर्धात्मक मतभेद असतात अशा वेळी या चुकीच्या पद्धतीने स्पर्धा संयोजन झाल्यास निकालात सूडाचे राजकारण घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– डॉ. श्याम वसंत शिंदे
अध्यक्ष समांतर रंगभूमी कलावंत संघटना , महाराष्ट्र

COMMENTS