बीड प्रतिनिधी - आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्थांचे जिल्हा भरात जाळे निर्माण कर
बीड प्रतिनिधी – आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्थांचे जिल्हा भरात जाळे निर्माण करून मुलं आणि मुलींना शिक्षणाची दारे खुली करणार्या स्व. काकूंच्या संघर्षाला यश मिळाले आहे. मुलांचे भविष्य आणि भवितव्यासाठी शिक्षक आणि पालकांचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले असून काकूंनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून या वटवृक्षाच्या छायेत अनेक उच्चपदस्थ विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मुलं यशस्वी झाले असून याचा आपल्याला अभिमान वाटतो असे प्रतिपादन मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था, नवगण व विनायक युवक कल्याण शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 जुर्लै रविवार रोजी सकाळी 11 वाजता रविराज मंगल कार्यालय बीड येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये यशवंतांचा व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, नानासाहेब काकडे, हर्षद क्षीरसागर, सखाराम मस्के, राजेंद्र पवार, काकासाहेब जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारीप्रा. राजा मचाले यांनी केले. यावेळी उच्च पदावर कार्यरत असलेल्या यशवंत विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून आत्मविश्वासाने सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून आज गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येत आहे आज आगळावेगळा कार्यक्रम असून विविध क्षेत्रात यश मिळवणार्यांचा सन्मान होतो आहे याचा आनंद आहे. नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही अनेक मुले संघर्ष करत यश मिळवत आहेत. स्पर्धेच्या युगात साध्य गाठण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती मुलं करत आहेत. विद्यार्थी घडवणार्या गुरुजी आणि पालक यांची मोठी कसोटी असते. शिक्षणात गोडी निर्माण करण्यासाठी सर्वच बाजूने पाठबळ असावे लागते. विजापूर येथे इयत्ता चौथीत शिक्षण घेत असताना स्व.काकूंनी जे स्वतः अनुभव घेतले त्या अनुभवासारखे प्रसंग इतरांवर येऊ नये हा उदात्त हेतू ठेवून त्यांनी बीड जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. या संस्थांच्या माध्यमातून फक्त शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. मुलगी शिकली पाहिजे हा मुख्य हेतू ठेवूनच काकूंनी आपल्या संस्थांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था देखील केली. जिथे कुठलीच सुविधा नव्हती तिथे संस्थेच्या वतीने शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. जिद्द व चिकाटीने अभ्यास करून सरस्वतीला प्रसन्न करून घेणारी मुले आजही मोठ-मोठ्या पदावर काम करत आहेत. मुलांच्या भवितव्य आणि भविष्यासाठी पालकांचे योगदान महत्त्वाचे असते. विज्ञान हे एक वरदान आहे पण त्याचा उपयोग प्रगतीसाठी केला पाहिजे. मुलांना बालवयापासूनच घर आणि शाळेतून संस्कार मिळाले तर तो मुलगा कुठल्याही स्पर्धेत सहभागी व्हायला तयार होतो. यासाठी शिक्षक आणि पालकांची मोठी जबाबदारी असते. गुणवत्तेवर जो टिकतो तोच भविष्यकाळात पुढे जातो असे ते म्हणाले. यावेळी मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकूंच्या अथक प्रयत्नातून ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करत संस्थांचा विस्तार केला आज त्याचा मोठा वटवृक्ष तयार झाला असून या वृक्षाच्या छायेत अनेक उच्च पदस्थ आणि विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी आजही यशस्वीपणे जीवन जगत असून याचा आपल्याला अभिमान वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे म्हणून स्व.काकूंनी उभारलेल्या संस्था आणि संघर्षाला आज यश मिळाले असून शिक्षणाचा मजबूत पाया भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अरूण बोंगाणे, चंद्रकांत पेंढारे, सुभाष क्षीरसागर, एम.ए.राऊत, लक्ष्मण लकडे यांच्यासह संस्थेतील सर्व प्राचार्य, उप प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी सूत्रसंचालन प्रा श्रीराम जाधव यांनी केले.
COMMENTS