विभागीय आयुक्त राव यांनी प्रस्ताव फेटाळला: पद रद्द करण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबावइस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीमधी
विभागीय आयुक्त राव यांनी प्रस्ताव फेटाळला: पद रद्द करण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व नियमबाह्य कामकाजास ग्रामसेवक सुरेश पाटील हे जबाबदार आहेत. पण राजकीय दबावाने सरपंच मिनाक्षीताई महाडिक यांचे पद रद्द करण्याचा घाट घालण्यात आला. मात्र, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कारवाईचा आदेश अमान्य करुन श्रीमती महाडिक यांना पदावरुन दूर करता येणार नाही, असा निकाल दिला. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुडबुध्दीच्या राजकारणाला चपराक बसली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पेठ ग्रामपंचायतीचे कामकाज नियमबाह्य सुरु असून अनियमितता असून ग्रामसेवक सुरेश पाटील यांची बदली करावी. तसेच अहिरवाडी ग्रामसेवक सचिन भिसे यांनी दप्तर गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी लेखी मागणी करताना वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यांच्यावरील कारवाई राहिली, बाजूलाच उलट प्रशासनाने राजकीय दबावाखाली सरपंच मिनाक्षीताई महाडिक यांना पदावरुन हटवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली. ही बाब निषेधार्ह आहेच. शिवाय ज्या राजकीय नेत्यांनी प्रशासनावर दबाव टाकला त्यांच्या बुध्दीची कीव करावी, तितकी थोडी आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पहाणार्या या नेत्यांना हे संकुचित राजकारण शोभणारे नाही, असा टोला माळी यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, पेठ ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व नियमबाह्य कामकाज प्रकरणी सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (1) नुसार कार्यवाही प्रस्तावित करणेस पूर्वपरवानगी मिळण्याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मार्च 2021 मध्ये अपील केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंतिम अहवाल आयुक्तांकडे सादर केला. आयुक्त राव यांनी दप्तर तपासणीसाठी चौकशी समिती नेमणुकीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. त्याप्रमाणे दप्तर तपासणी झाली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व श्रीमती महाडिक यांनी ऑनलाईन सुनावणीत म्हणणे मांडले. दरम्यान, सरपंच श्रीमती महाडिक यांनी लेखी मुद्यांसह खुलासा करण्यासाठी अवधी मागितला. ती संधी ही त्यांना देण्यात आली. दरम्यान, वाळवा पंचायत समितीचे गट विकास अधिकार्यांनी याप्रकरणी ग्रामसेवक पाटील यांना निलंबीत केले. या प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त राव यांनी सरपंच श्रीमती महाडिक यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 39 (1) नुसार पदावरुन दूर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेला प्रस्ताव अमान्य केला आहे.
माळी म्हणाले, सरपंच मिनाक्षीताई महाडिक यांना पदावरुन दूर करण्यासाठी काहींनी देव पाण्यात घातले होते. पण या आदेशाने त्यांना चपराक बसली आहे. महाडिक यांनी नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काम केले आहे. त्यांनी पदरमोड करुन अनेकांना उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. अपहार आणि भ्रष्टाचार यास त्यांच्याकडे थारा नाही. पण वाळवा तालुक्यातील काही राजकारणी महाडिक कुटुंबाचे राजकारण मोडू पहात आहेत. पण ते शक्य नाही. कुणी कितीही कलुषित राजकारण केले, तरी त्यास पुरुन उरण्याची धमक आमचे नेते राहुल व सम्राट महाडिक यांच्याकडे आहे. त्यामुळे यापुढे त्यांना यापुढे ही जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी वाळवा पंचायत समितीच्या सदस्य वसुधा दाभोळे, उपसरपंच चंद्रकांत पवार, माजी उपसरपंच अमीर ढगे, शंकर पाटील, दिलीप कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS