Homeताज्या बातम्यासंपादकीय

चांद्रयानमुळे अवकाश खुले

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर कोट्यावधी भारतीयांनी जल्लोष केला. खरंतर भारत स्वातंत्र्य होवून उणेपुरे 75 वर्ष झाले आ

सत्ता-संघर्षाचे राजकारण
जननायकाचा गौरव
पायाभूत सुविधांचा अभाव

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर कोट्यावधी भारतीयांनी जल्लोष केला. खरंतर भारत स्वातंत्र्य होवून उणेपुरे 75 वर्ष झाले आहे. या 75 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात ती दैदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यावरून आपल्या प्रगतीचा अंदाज येतो. चंद्रावर जाणार्‍या चार देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तसेच अवकाश मोहिमांमध्ये भारताची विश्‍वासार्हता इतर देशांपेक्षा उजवी ठरतांना दिसून येत आहे. चांद्रयान मोहिमेमुळे संशोधनासाठी एक नवे विश्‍व भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोसाठी खुले झाले आहे. या मोहिमेमुळे चंद्रावरील विश्‍व नेमके काय आहे, याचा अभ्यास शास्त्रज्ञांना करता येणार आहे. मुळातच चंद्रावर पाणी आहे का ? जर पाणी असेल, तर चंद्रावर जीव, जंतू असू शकतात, म्हणजे चंद्रावर मानवी सृष्टी राहू शकते, असा त्यातून अंदाज बांधता येतो. त्यामुळे चांद्रयान मोहिमेमुळे काय होणार ? गरिबांच्या घरात भाकर नाही, त्यामुळे अशा मोहिमांनी काही फरक पडत नाही, असेही काहीजण ज्ञान पाजळतांना दिसून आले. मुळातच चांद्रयान मोहिमेचा खर्च 615 कोटी आहे. एखाद्या आंतराळ मोहिमेवरील हा सर्वात कमी खर्च आहे. रशियाच्या लुना 25 या मून मिशनचे बजेट 1500 कोटी रुपयांहून अधिक होते.त्यामुळे अमेरिका, रशियासारख्या देशांनी अवकाश मोहिमेवर जो खर्च केला आहे, त्या तुलनेत हा खर्च नगण्य आहे. त्यामुळेच इस्त्रोची विश्‍वासार्हता वाढतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवण्याचे काम देखील इस्त्रो करतांना दिसून येत आहे. मात्र आज आपण जे यश पाहतो आहे, त्याची मुहूर्तमेढ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रोवली. खरंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशापुढे अन्नधान्यांची टंचाई होती, दोनवेळचे अन्नधान्य पुरेल अशी आपली परिस्थिती नव्हती. त्याचबरोबर औद्योगिकीकरण पुरेसे झालेले नव्हते, अशा परिस्थितीमध्ये पंडित नेहरू यांनी विक्रम साराभाई यांना पाचारण करून इस्त्रोची मुहूर्तमेढ रोवत, त्यांना या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी या संस्थेला स्वायत्त दर्जा दिल्यामुळेच आजचे यश आपण पाहू शकलो. नेहरूंनी अवकाश संशोधन कार्यक्रमास प्रोत्साहन दिले. 1957 मध्ये रशियाने स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून संपूर्ण जगास अवकाशात प्रक्षेपणाचा मार्ग दाखवला. भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची सन 1962 मध्ये स्थापना करण्यात येऊन विक्रम साराभाई यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले. रशियासोबत असलेल्या मैत्रीमुळे, इस्रोस अंतराळ कार्यक्रम व भारतास अणुऊर्जा कार्यक्रम राबविणे सोपे झाले. आणि भारताने आज अवकाश संशोधन क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवत उंचभरारी घेतली आहे. भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झाले. मात्र सॉफ्ट लँडिग हा शब्द वारंवार शास्त्रज्ञांच्या तोंडून ऐकायला येत आहे. चांद्रयान -3 चा विक्रम लँडर ताशी दहा किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर बसले आहे. जर ते सॉफ्ट लँडिग झाले नसते तर, ते चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या चांद्रयान-2 च्या लँडरप्रमाणे खूप वेगाने पडले असते. पण चांद्रयान-3 चे विक्रम लँडर अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की ते चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड होवू शकेल. जगात आतापर्यंत झालेल्या सर्व सॉफ्ट लँडिंगपैकी दोनपैकी फक्त एकच सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाली आहे. याआधी भारताचे चांद्रयान-2 लँडर क्रॅश झाले होते. चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर जी धूळ उडाली ती खाली बसण्यास 2 तासांपेक्षा जास्त कालावधी गेला. धूळ खाली बसण्याआधी रोव्हर बाहेर आलं असतं तर त्याच्यावर असलेल्या कॅमेरांवर धूळ बसली असती तसेच आतील उपकरणाचे नुकसान होऊ शकले असते. त्यामुळेच रोव्हर 2 तास 26 मिनिटांनी बाहेर आले. चांद्रयान 1 या मोहिमेच्या वेळी चंद्रावर पाण्याचे अंश आढळले आहेत. आता रोव्हर प्रज्ञान याविषयी काय काय माहिती पाठवणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. चांद्रयान 3 चे एकूण वजन 3900 किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन 2148 किलोग्रॅम आहे आणि लँडर मॉड्यूलचे वजन 1752 किलो आहे, त्यात 26 किलोच्या रोव्हरचा समावेश आहे. भारताचे हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात आले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा पहिलाच देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आंतराळ यान उतरवणे हे सर्वात अवघड आहे. येथे तापमान उणे 230 उंश सेल्सिअस इतके आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. केवळ याच कारणासाठी इस्रोने आपले यान दक्षिण ध्रुवावर उतरवले आहे. चंद्रावरील संशोधनात भारत आगामी काही वर्षांमध्ये आघाडी घेईल यात नवल नाही.

COMMENTS