Homeताज्या बातम्याक्रीडा

कर्णधार टेंबा बवुमा ठरला दक्षिण आफ्रिकेसाठी खलनायक!

क्रिकेट समीक्षा

बघता बघता तेरावी विश्‍वचषक स्पर्धा अगदी अंतिम सामन्याजवळ येऊन पोहोचली. मागील दिड महिना तमाम क्रिकेट शौकिनांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली हि मह

इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा
स्टेडियममध्ये महिलेकडून पोलिसाच्या कानाखाली !
क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात विजयाने करा !

बघता बघता तेरावी विश्‍वचषक स्पर्धा अगदी अंतिम सामन्याजवळ येऊन पोहोचली. मागील दिड महिना तमाम क्रिकेट शौकिनांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली हि महान स्पर्धा नवा विश्‍वविजेता शोधण्यासाठी सुरू आहे आणि संशोधन कार्याचा शेवट येत्या रविवारी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. यजमान भारत व पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पीयन ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता क्रिकेट जगताचा नवा सम्राट असेल.  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारताने पारंपारीक प्रतिस्पर्धी न्युझिलंडला एका शानदार लढतीत हरवून अंतिम फेरी गाठली हे सर्वश्रूत आहे. भारताचा अंतिम फेरीतील आव्हानवीर कोण असेल हे गुरुवारी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सर्वांना समजले. क्रिकेट जगतातील दोन तुल्यबळ संघ दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अटितटीचा सामना झाला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारून अहमदाबादचे तिकीट बुक केले. वास्तविक या सामन्याचा जो निकाल लागला त्याच्या विपरीत निकालाची क्रिकेट जगत वाट बघत होते.

मात्र द. आफ्रिका संघ आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यात ऐनवेळी पचकणारा म्हणजे चोकर्स  म्हणून कुृप्रसिद्ध आहेत. या सामन्यातही तसंच काही घडलं. मात्र चोकर्स प्रकारात मोडणारा तो प्रकार नव्हता. एक तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान त्यांना समजले नाही किंवा जाणूनबुजून हारणे यातला हा भाग काहिसा वाटतो. द. आफ्रिका संघ या स्पर्धेत आक्रमक फलंदाजी व धावांचे इमले बांधण्यास प्रसिध्द झाला. खास करून त्यांनी प्रथम फलंदाजी करताना अनेक विक्रम पादाक्रांत करून सांघिक विक्रमी धावा केल्या तर त्यांचे क्विंटन डिकॉक, हेन्रीच क्लासेन, रासी वान ड्युसेन, एडन मार्करम, मार्को जेनसन यांनी आपल्या बॅटचा तडाखा अनेक संघाना दिला. हो, धावांचा पाठलाग करताना मात्र त्यांची जरा तारांबळ झालीच. नवख्या नेदरलँडने त्यांना लोळविळे, यजमान भारताने तुडविले तर पाकिस्तानविरूध्द थोडक्यात बचावले. नऊ सामन्यात सात विजयांसह सरस धावगती राखत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले व इतकेच गुण मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या स्थानावर ढकलले. मात्र स्पर्धेच्या नियमानुसार या दोन संघातच उपांत्य सामना होणार होता. सामन्याची नाणेफेक द. आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी घेऊन त्यांच्या समर्थकांत आत्मविश्‍वास जागृत केला.

दक्षिण आफ्रिका या सुवर्णसंधीचा लाभ उठवून आपल्या लौकीका प्रमाणे खेळ करून मोठी धावसंख्या रचेल व त्यांचे गोलंदाज बाकीचं काम पूर्ण करून ऑस्ट्रेलियाला नमवतील असं साधं सोपं गणित सर्वांच्याच मनात होतं. पण मनात असतं तेच क्रिकेटच्या मैदानावर घडतंच असं नाही. त्याची प्रचिती प्रत्यक्ष सामना सुरू झाल्यावर आली. एरवी शर्यतील्या घोड्यासारखे उधळणारे आफ्रिकन फलंदाज गोष्टीतल्या कासवासारखे शांत झाले होते. त्यांची कुर्मगती फलंदाजी कसोटी सामन्यालाही लाजवेल अशी होती. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड यांनी भेदक मारा तर केलाच परंतु त्याही पेक्षा जास्त दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी हाराकिरी केली. त्याची सुरुवात शुन्यावर बाद होऊन कर्णधार टेंबा बवुमानेच केली. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक चार शतकं ठोकणार्‍या डिकॉकने चुकीचा फटका मारला. एवढं कमी की काय म्हणून फॉर्मात असलेल्या एडन मार्करम व रासी वान ड्युसेननेही तीच चुक केली. घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिकन संघाची पावर प्लेमध्ये तर दहा षटकात 3 बाद नऊ अशी स्थिती झाली होती.

चार बाद चोवीस अशा दयनिय स्थितीतून डेव्हीड मिलर व हेन्रीच क्लासेनने डाव काहीसा सावरला असे वाटत असतानाच पार्ट टाईम गोलंदाज ट्रेव्हीस हेडने क्लासेन (47 धावा) व फॉर्मात असलेला मार्को जेनसन यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करून हॅट्रीकची संधी निर्माण केली होती. त्यामुळे सावरू पाहणारा आफ्रिकन डाव आणखी विखरला. मात्र दुसर्‍या बाजूने गोलंदाजांचा किलर म्हणून प्रसिद्ध असलेला डेव्हिड मिलर नांगर टाकून उभा होता. त्याने  निर्धार व जिगर यांचा सुंदर मिलाफ करून संयमी शतक ठोकून संघाला लढण्या इतक्या 212 धावा फलकावर लावून दिल्या. पण अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी त्या पुरेशा नव्हत्या. हे हेड व वॉर्नरने केलेल्या फटकेबाजीमुळे सिद्ध झालेच. हेडने धुवाँधार 62 धावा ठोकून संघाच्या यशाची पायाभरणी केली. पुढे जात मार्करमच्या फिरकीचा तो बळी ठरला. त्यानंतर आफ्रिकन फिरकी गोलदांज केशव महाराज, तबरेज शम्सी व मार्करमने ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळवत सात बळी घेतले. परंतु शेवटी कर्णधार पॅट कमिन्स व मिचेल स्टार्कने कुठलीही गडबड न करता संयमाने खेळून एक एक धाव गोळा करत विजयी लक्ष गाठत विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत आठव्यांदा ऑस्ट्रेलियाला पोहचविले. द. आफ्रिका या सामन्यात जिंकलीही असती. मात्र यामध्ये त्यांचे फलंदाज जबाबदारीने खेळले नाही. क्षेत्ररक्षकांनी गाठीशी छोटीशी धावसंख्या असताना ढिसाळ क्षेत्ररक्षण केले.

शिवाय पाच झेल सोडून स्वतःच्याच हाताने अडचणी वाढवून घेतल्या. शिवाय खेळपट्टी फिरकीला साथ देत आहे हे लक्षात येऊनही कर्णधार टेंबा बवुमाने महाराज व शम्सीला उशीरा गोलंदाजी दिली. शेवटी विजयाचे दार उघडू पहात असताना कर्णधाराच्या चालीही कमी पडत होत्या. कर्णधार टेंबा बवुमा म्हणजे संघासाठी असून अडचण व नसून खोळंबा यातला प्रकार आहे. या बिचार्‍याला धड बॅटींग येत नाही ना धड क्षेत्ररक्षण. कर्णधार पदाचा डोलारा याच्या कुवतीपेक्षा जास्तच जड असल्याचे त्यानेच सिद्ध केले. त्याला धड क्षेत्ररक्षण लावता येत नाही ना गोलंदाजीत योग्य ते बदल करता येत नाहीत. त्याच्या नेतृत्व गुणांमुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचली नाही तर इतर खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर ! टेंबा बवुमा केवळ तेथील सरकारच्या वर्णभेद नितीच्या तोडग्याचा भाग म्हणून कर्णधार पदावर आहे. वास्तविक तो संघात घेण्याच्या लायकीचाही नाही. उपांत्य सामना चालू असताना भर मैदानात एक चित्र दिसायचं सगळे दक्षिण आफ्रिकन खेळाडू एकत्र यायचे, मग त्यात कष्णवर्णीय व गोरे खेळाडूही असायचे. तर बवुमा एकटाच कुठेतरी मैदानात उभा असायचा. बवुमा काही सामन्यात खेळला नव्हता तेंव्हा त्याच्या ऐवजी खेळणार्‍या रीसा हेंड्रींक्सने शानदार कामगिरी केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या कोटा सिस्टममुळे बवुमाचं फावलं, रीसा हेंड्रीक्सचं नुकसान झालं तर दक्षिण आफ्रिकेचा संघ म्हणून फार मोठा तोटा झाला. वबुमाने दहा सामन्यात केवळ 134 धावा काढून स्वतःचे हसे तर करून घेतलेच पण अंतिम फेरी गाठून विश्‍वचषक जिंकण्याची संघाची संधीही गमावली. खर्‍या अर्थानं बघितलं तर टेंबा बवुमा दक्षिण आफ्रिकेच्या मिशन वर्ल्ड कप 2023 मार्गातला नुसता अडथळाच ठरला नाही खलनायकही बनला.
– इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए. मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
डॉ. दत्ता विघावे
श्रीरामपूर, अ. नगर मोबाईल नंबर – 9096372082. 

COMMENTS