अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिकेच्या प्रभाग 9-क या खुल्या जागेच्या पोटनिवडणुकीत अजून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी दाखल करण्यास सोमवारी
अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिकेच्या प्रभाग 9-क या खुल्या जागेच्या पोटनिवडणुकीत अजून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी दाखल करण्यास सोमवारी (6 डिसेंबर) अखेरची मुदत आहे. त्यामुळे या दिवशी जुन्या महापालिकेत इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची झुंबड उडणार आहे. मागील दोन दिवसात आणखी 8जणांनी कोरे उमेदवारी अर्ज नेल्याने आतापर्यंत कोरे अर्ज नेणारांची संख्या 29 झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नसून आघाडी होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
मनपा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत (दि.6) मुदत आहे. मनपाच्या प्रभाग 9 (क) या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही निवडणूक होत आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दि.29 नोव्हेंबरपासून कोरे उमेदवारी अर्ज वितरण व माहिती भरलेले अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झालेली आहे. पण मागील पाच दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सुरुवातीच्या तीन दिवसात 21जणांनी अर्ज नेले होते तर मागील दोन दिवसात सुमित मेहेरा, राकेश भोगवाल, संजय सत्रे, प्रतापसिंग परदेशी, राजेंद्र विद्ये, अनुराधा माळावे, अजय माळावे व गणेश पाथारे अशा आणखी 8जणांनी अर्ज नेले आहेत. आता या पोटनिवडणुकीला पहिल्या उमेदवारी अर्जाची प्रतीक्षा आहे व तो सोमवारी अखेरच्या दिवशीच भरला जाणार आहे. या पहिल्या अर्जासह कोरे अर्ज नेणारांपैकी आणखी कितीजण रिंगणात उतरतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
महाविकास आघाडीचे काय?
पोटनिवडणुकीत मनपातील महाविकास आघाडी उतरणार की नाही, याचा संभ्रम कायम आहे. मात्र, दुसरीकडे उमेदवार निश्चित करण्यासाठी शिवसेनेची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीस संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, विक्रम राठोड, गणेश कवडे आदी उपस्थित होते. या बैठकीत माजी नगरसेवक सुरेश तिवारी यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. यावेळी सेनेतील अन्य इच्छुकही उपस्थित होते. तिवारी यांनी 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत याच प्रभागातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, माजी नगरसेवक आरीफ शेख, दीप चव्हाण, अभिजीत चिप्पा, गौरव ढोणे, प्रदीप परदेशी, गिरीश जाधव, कैलास शिंदे यांच्यासह अन्य इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शिवसेनेकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. मनपात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याकडे लक्ष आहे. भाजपकडून चिप्पा व परदेशी यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान, श्रीपाद छिंदमच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चाही जोरात आहे.
COMMENTS