पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालण्याची ग्राहक पंचायतची मागणी अकोले : आखातातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर क

पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालण्याची ग्राहक पंचायतची मागणी
अकोले : आखातातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या उद्योगांना एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरासाठीच गॅस पुरवठा करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिले आहेत. मात्र या निर्णयानंतरही अकोले तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत असून काळाबाजार वाढत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
घरगुती ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. याकडे पुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी अकोले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार गॅस वितरकांनी काही अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार वितरकांनी शंभर टक्के रिफिलिंग सिलिंडरची विक्री ग्राहकांना घरपोच करणे आवश्यक आहे. तसेच गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर साठ्याबाबत माहिती दर्शविणारा फलक लावून त्यावर दररोज उपलब्ध साठा, विक्री, शिल्लक साठा आणि सिलिंडरचा दर नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या सर्व अटी व शर्तींचे गॅस वितरकांकडून काटेकोर पालन होत आहे की नाही, यावर पुरवठा विभागाने लक्ष ठेवावे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होणार नाही आणि ग्राहकांना वेळेवर गॅस मिळेल यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव राम रुद्रे, वसंतराव बाळसराफ, रामदास पांडे, सचिन जोशी, भाऊसाहेब वाकचौरे, धनंजय संत, मच्छिंद्र चौधरी, सुशांत वाकचौरे, संतोष खांबेकर, सखाराम खतोडे, ज्ञानेश्वर चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS