Homeताज्या बातम्यासंपादकीय

मध्यप्रदेशात भाजपचे ओबीसी कार्ड

भाजप हा जसा धुर्त पक्ष आहे, तसाच तो चाणाक्ष असलेला देखील पक्ष आहे. केवळ चेहरा बघून नेतृत्वाची संधी भाजप कुणाला देत नाही, तर त्यापासून पक्षाला काय

पाकिस्तानची हतबलता
कर्नाटकातील जातीय समीकरण
राजकारणातील गाफीलपणा

भाजप हा जसा धुर्त पक्ष आहे, तसाच तो चाणाक्ष असलेला देखील पक्ष आहे. केवळ चेहरा बघून नेतृत्वाची संधी भाजप कुणाला देत नाही, तर त्यापासून पक्षाला काय फायदा होणार, याचा विचार करूनच भाजप संधी देत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कारण चारवेळेस आणि तब्बल 16 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांना डावलून भाजपने मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देत पुन्हा एकदा आपले ओबीसी कार्ड खेळले आहे. मोहन यादव माध्यमांपासून दूर असलेले आणि चर्चेत नसणारे व्यक्तीमत्व आहे. शिवाय त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे डाग नाही. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ओबीसी समीकरणही साधले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये सत्ता मिळवत आगामी निवडणुकीची चुणूक दाखवून दिली आहे. छत्तीसगडमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आादिवासी नेते विष्णू देव साय यांची निवड केली. त्यानंतर मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात भाजप मुख्यमंत्रीपदी कुणाला संधी देणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. राजस्थानाचा निर्णय अजूनही झालेला नसला तरी, मध्यप्रदेशात भाजपने पुन्हा एकदा ओबीसी कार्ड खेळत मोहन यादव यांना संधी दिली आहे. खरंतर मध्यप्रदेशात चार वेळेस आणि 16 वर्षे मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांना भाजपने डावलत मोहन यादव यांना संधी दिली आहे. पाचव्यांदा भाजप चौहान यांना मुख्यमंत्रिपदाची संधी देईल अशी शक्यता असतांना, त्यांना डावलण्यात आले आहे. पंतप्रधान मोदीनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शिवराजसिंह चौहान यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. मात्र चौहान यांचे पंख भाजप पक्षश्रेष्ठीने कापत मोहन यादव यांना संधी दिली आहे. मध्यप्रदेशात 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी चौहान यांच्या विरोधात वातावरण राहिले होते. मात्र त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्यानंतर आणि लाडली बहन योजना सुरू केल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम मध्यप्रदेशात बघायला मिळाला. अन्यथा मध्यप्रदेश भाजपच्या हातून जाईल अशीच परिस्थिती होती. असे असतांना, चौहान यांनी राबविलेल्या योजना, आणि विरोधकांना धैर्याने तोंड दिल्यामुळे मध्यप्रदेशात भाजपने प्रचंड असे बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपने मोहन यादव यांना संधी देत, आगामी लोकसभा निवडणुकीची पायाभरणी केल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लावावी यासाठी खल सुरू होता. अखेर तिसर्‍यांदा आमदार झालेले आणि चौहान यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राहिलेले मोहन यादव यांना भाजपने संधी देत पुन्हा एकदा ओबीसी कार्ड खेळले आहे. यासोबतच भाजपने उत्तरप्रदेशात राबवलेला दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉम्युर्ला मध्यप्रदेशात देखील राबवला आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील. यासोबतच केंद्रात कृषीमंत्री राहिलेले नरेंद्रसिंह तोमर यांना मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे. खरंतर भाजपने याठिकाणी केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या तोमर यांचे देखील पंख छाटले आहेत. त्यांना पुन्हा नवी संधी देण्याऐवजी, किंवा नाविण्यपूर्ण, खाते देण्याऐवजी त्यांना विधानसभा अध्यक्ष बनवत, त्यांना आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीने दिल्याचे दिसून येत आहे. खरंतर मोहन यादव काही माध्यमांतील चर्चेत असणारा चेहरा नाही. यासोबतच पक्षाने जनतेमध्ये योग्य तो संदेश दिला आहे. यादव यांची निवड करून भाजपने चौहान यांची सत्ता खालसा केली आहे. जर चौहान यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद दिले असते तर, त्याचा फटका पक्षाला लोकसभेला बसला असता, त्यामुळे भाजपने नवा चेहरा देत, लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा ओबीसी कार्ड वापरले आहे. 

COMMENTS