भाजप हा पक्ष राजकारणात चांगलेच मुरलेला पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी, तो धक्कातंत्र देण्यात देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. काँगे्रसमध्ये ज्याप्रकार
भाजप हा पक्ष राजकारणात चांगलेच मुरलेला पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी, तो धक्कातंत्र देण्यात देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. काँगे्रसमध्ये ज्याप्रकारे अनेक नेत्यांनी आपल्या सरंजामदारपद्धतीने आपले प्रस्थ प्रस्थापित केले होते, त्या पद्धतीने भाजप कुणाला आपले प्रस्थ वाढवू देत नाही. भाजपने पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, हा संदेशच एकप्रकारे दिला आहे. तो संदेश देण्यामध्ये काँगे्रस कमी पडली. त्यामुळे काँगे्रसचे अनेक सरंजमादारशाही जोपासणारे नेते काँगे्रसला सोडून जातांना दिसून येत आहे. त्यामुळे सरंजामशाही जोपासणारे नेते बाहेर पडल्यामुळे तो जिल्हा, त्या विभागात काँगे्रसचा प्रभाव ओसरल्याचे दिसून येते. याउलट भाजपने व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ही संकल्पना अधिक विस्तृत केली. त्यामुळेच राजस्थानमध्ये सत्ता येऊनही वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही, मध्यप्रदेशात सत्ता येऊनही शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नाही. त्यामुळे धक्कातंत्र देण्यास भाजप पहिल्यापासून माहीर असून, लोकसभा निवडणुकीत देखील भाजप पुन्हा एकदा उमेदवारीवरून धक्कातंत्र देण्याची शक्यता आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचा चांगलाच अभ्यास केला, त्यासोबतच त्यांनी सर्व्हे केला. त्यानुसार अनुकूल असलेल्या आणि चांगले काम असलेल्या जागी जुन्या नेत्यांना परत संधी मिळणार आहेतच. मात्र ज्या ठिकाणी निवडणून येण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी भाजप नवा चेहरा देणार असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कट होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी भाजपने निवडून येण्याची क्षमता हा एकमेव अट ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असले तरी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसकडून सर्वाधिक जागेची मागणी करण्यात येत आहे. मात्र निवडून येण्याची क्षमता असेल तरच जागा मागा असा इशाराच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. शिवाय ज्या ठिकाणी विद्यमान खासदार निवडून येणार नाही, त्याठिकाणी उमेदवार बदलत असाल तरच तुम्हाला ती जागा सोडू असे स्पष्ट संकेत शहा यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही तासांचा अवधी असतांना, महायुतीतील जागांवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी जागा जाहीर करून भाजप धक्कातंत्रांचा अवलंब करणार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यामागचे प्रमुख कारण म्हणजे नाराजी वाढण्याची शक्यता होती. कारण भाजपमध्ये अनेकजण आपले सरकार असतांना देखील मंत्रीपद मिळत नसल्यामुळे नाराज आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे मंत्री तर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून, आपली वर्णी लागेल या आशेवर होते. मात्र अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदे देण्यात आली, मात्र शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना मात्र संधी देण्यात आली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नाराजीचा सूर वाढू नये, आणि आमदार पक्ष सोडून जावू नये, यासाठी काळजी घेण्यात आली होती. तोच कित्ता लोकसभा निवडणुकीसाठी गिरवण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज आणि उमेदवारीसाठी इच्छूक असलेले उमेदवार इतर पक्षात प्रवेश करू शकतात, त्यामुळे ही बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यास पक्षांतर्गत बंड टाळता येईल, त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप सध्यातरी होण्याची शक्यता नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाय या यादीमध्ये शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक खासदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडे असणारे खासदार कमी असल्यामुळे अजित पवार गटाला इतका मोठा फटका बसण्याची शक्यता कमीच आहे. मात्र यानिमित्ताने भाजपचे धक्कातंत्र आगामी काही दिवसांतच बघायला मिळू शकते.
COMMENTS