Homeअग्रलेख

भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नबीन यांच्याकडे सोपवली जाणे ही केवळ संघटनात्मक घटना नाही, तर भाजपच्या राजकीय प्रवासातील एक

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…
मशाल थंडावली, इंजिनची गतीही संपली ः सरनाईक यांची टीका
भाजपचे राज्यसभेचे राजकीय समीकरण !

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नबीन यांच्याकडे सोपवली जाणे ही केवळ संघटनात्मक घटना नाही, तर भाजपच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अवघ्या 45 व्या वर्षी बिनविरोध निवड होऊन नबीन पक्षाचे बारावे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. यासंदर्भात काँगे्रसने धडा घेण्याची खरी गरज आहे. अवघ्या 45 व्या वर्षी नितीन नबीन अध्यक्ष, अमित शहा 49 व्या वर्षी अध्यक्ष या बाबी बघता काँगे्रसने नव्या नेतृत्वाला संधी देण्याची खरी गरज आहे. पक्ष कसा चालवावा, नवे नेतृत्व कसे घडवावे आणि नव्या तरूण उमद्या चेहर्‍यांना कशी संधी द्यावे याचे उदाहरण भाजपने घालून दिले आहे. त्यामुळेच भाजप विविध निवडणुकीत विजय मिळवतांना दिसून येतो. वास्तविक पाहता भाजपच्या अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील चर्चेत होते, मात्र त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. मात्र या निवडीला प्रतीकात्मक महत्त्वही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले आणि मी कार्यकर्ता आहे, नितीनजी माझे बॉस आहेत, असे विधान करून नेतृत्व, नम्रता आणि संघटनशिस्त यांचा अनोखा संगम समोर आणला.
भाजपच्या परंपरेत अध्यक्षपद हे केवळ पद नसून दिशा देणारी जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अध्यक्षांचे प्रत्येक वाक्य कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. या विधानातून पक्षातील लोकशाही संस्कृती, वरिष्ठ- कनिष्ठ असा दुरावा न ठेवता कार्यकर्ताकेंद्रित विचारसरणी अधोरेखित होते. ‘अध्यक्ष बदलतात, पण आदर्श बदलत नाहीत,’ हा भाजपचा दावा या वेळी अधिक ठळकपणे पुढे आला. नितीन नबीन यांची निवड ही ‘तरुण नेतृत्व, पण अनुभवी हात’ या संकल्पनेचा विस्तार आहे. भाजप युवा मोर्चा, संघटनात्मक जबाबदार्‍या, राज्य प्रभारीपद अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. त्यामुळे संघटन, निवडणूक व्यवस्थापन आणि आघाडी समन्वय या तिन्ही आघाड्यांवर त्यांची कसोटी लागलेली आहे. एनडीएशी समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे, हे लक्षात घेतले तर ही निवड केवळ पक्षांतर्गत नाही तर राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. या निवडीच्या निमित्ताने मोदींनी मांडलेले मुद्दे व्यापक राजकीय संदर्भ देतात. घराणेशाहीविरोधी भूमिका, एक लाख नव्या तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घुसखोरीविरोधातील कठोर भूमिका आणि शहरी नक्षलवादाविरोधातील इशारा-या सर्व बाबी भाजपच्या पुढील काळातील राजकीय अजेंड्याची रूपरेषा स्पष्ट करतात. ‘राजकारण हे काही मोजक्या कुटुंबांचे मक्तेदारीचे क्षेत्र नसावे’ हा संदेश पुन्हा एकदा ठामपणे दिला गेला.
भाजप स्वतःला ‘पक्षा’पेक्षा ‘संस्कृती’ मानतो, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. सदस्यत्वापेक्षा नातेसंबंध महत्त्वाचे आहेत, हे सांगताना त्यांनी संघटनात्मक भावनिक बांधिलकीवर भर दिला. या दृष्टीने नितीन नबीन यांची साधेपणा, सहजता आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची शैली पक्षासाठी उपयुक्त ठरू शकते. नेतृत्व बदलले तरी कार्यकर्त्याशी असलेला संवाद आणि जमिनीशी असलेली नाळ तुटू नये, ही अपेक्षा यातून व्यक्त होते.
‘पुढील 25 वर्षे निर्णायक आहेत,’ हे पंतप्रधान मोदींचे विधान केवळ भाषणाचा भाग नाही, तर विकसित भारताच्या संकल्पनेचा राजकीय आराखडा आहे. 21व्या शतकाच्या दुसर्‍या पंचवीस वर्षांत देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या नव्या उंचीवर नेण्याचा दावा भाजप करतो. नितीन नबीन हे त्या पिढीचे प्रतिनिधी मानले जात आहेत, जी रेडिओपासून एआयपर्यंतचा प्रवास अनुभवते. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधण्याची अपेक्षा त्यांच्या नेतृत्वाकडून केली जात आहे.
भाजपच्या इतिहासाकडे पाहिले तर जनसंघापासून आजपर्यंतचा 75 वर्षांचा प्रवास हा सातत्य, शिस्त आणि संघटनबळाचा आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांचा वारसा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक बैठक-या सर्वांचा संदर्भ मोदींनी आवर्जून दिला. हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता नितीन नबीन यांच्यावर आहे. तथापि, आव्हाने कमी नाहीत. देशांतर्गत राजकारणातील ध्रुवीकरण, विरोधकांचा एकत्र येण्याचा प्रयत्न, आर्थिक प्रश्‍न, तरुणांच्या अपेक्षा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता-या सार्‍यांचा सामना नव्या अध्यक्षांना करावा लागेल. केवळ संघटनात्मक यश नव्हे, तर वैचारिक स्पष्टता आणि सामाजिक समावेशकता जपणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल. एकूणच, नितीन नबीन यांची अध्यक्षपदी निवड ही भाजपच्या ‘नेतृत्व बदल, दिशा कायम’ या दाव्याची कसोटी आहे. मोदींनी दाखवलेली नम्रता आणि कार्यकर्ता-केंद्रित भाषा ही केवळ प्रतीकात्मक नसून पक्षाच्या अंतर्गत संस्कृतीचा संदेश देते. आता प्रश्‍न इतकाच की, या तरुण नेतृत्वाखाली भाजप आपले संघटन अधिक विस्तारेल का, नवे चेहरे घडवेल का आणि ‘विकसित भारत’च्या संकल्पनेला राजकीय वास्तवात किती उतरवेल? या प्रश्‍नांची उत्तरे येणार्‍या काळात मिळतील; मात्र आजचा दिवस भाजपच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय नक्कीच जोडणारा ठरतो.

COMMENTS