महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, मतदारांचा कौल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीने राज्याच्या राजकारणा

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, मतदारांचा कौल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीने राज्याच्या राजकारणातील अनेक नवे पदर उलगडले आहेत. सत्तेचे समीकरण, अस्तित्वाची लढाई आणि नव्या शक्तींचा उदय अशा त्रिवेणी संगमावर हा निकाल उभा आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपले संघटन कौशल्य आणि निवडणूक रणनीती सिद्ध केली आहे. अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन करत विजयाचा झेंडा फडकवला आहे. या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन. मतदारांनी त्यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर दाखवलेला हा विश्वास कौतुकास्पद आहे. दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत चिकाटीने खिंड लढवली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुंबईत दिलेली ही झुंज दुर्लक्षित करता येणार नाही. सत्तेचे वारे विरोधात वाहत असतानाही त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यात जी ‘काँटे की टक्कर’ दिली, ती त्यांच्या राजकीय जिद्दीचे प्रतीक आहे. त्यांच्या या लढाऊ वृत्तीचे नक्कीच कौतुक व्हायला हवे.
यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचितने काही जागांवर विजय मिळवून प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूर पालिकेत ३७ जागा मिळाल्या आहेत. यात काॅंग्रेसला ३२ तर, वंचित ला ५ जागांवर विजय मिळाला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या ७० जाागांसाठी गुरुवारी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी ६० टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून साडेतीनशे पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. एकूण ७० जागांपैकी विजयासाठी ३६ जागांची आवश्यकता असताना यामध्ये काँग्रेसला ३२ आणि वंचित बहुजन आघाडीला ५ जागा मिळाल्या आहेत. एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, ही युती येथे थेट सत्तेत आली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश लोकशाहीसाठी आश्वासक आहे. या यशाबद्दल वंचितच्या सर्व विजयी उमेदवारांना शाबासकी द्यायलाच हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) बाबतीत मात्र निकालाचे चित्र थोडे वेगळे राहिले. राज ठाकरे यांनी आपल्या झंझावाती सभांनी आणि आक्रमक प्रचाराने संपूर्ण निवडणुकीचा माहोल बदलून टाकला होता. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि त्यांनी मांडलेले मुद्दे यामुळे ‘मनसे’ मोठा चमत्कार करेल असे वाटत होते. राज ठाकरेंनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळून विरोधकांना विचार करायला भाग पाडले होते. परंतु, दुर्दैवाने या गर्दीचे आणि आक्रमकतेचे रूपांतर मतांमध्ये होऊ शकले नाही. “मनसे गरजला तसा बरसला नाही” असेच म्हणावे लागेल. प्रचारात डाव बदलण्याची ताकद दाखवूनही प्रत्यक्षात राजकीय यश त्यांच्यापासून दूर राहिले. या निवडणुकीच्या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्राचा मतदार आता अधिक जागरूक झाला आहे. जिथे भाजपने विजयाचा गुलाल उधळला, तिथेच उद्धव ठाकरेंनी अस्तित्वाची लढाई निकराने लढली. वंचितने तिसरा पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असली, तरी राज ठाकरेंना आपल्या वक्तृत्वाचे रूपांतर मतांच्या गणितात करण्यासाठी आगामी काळात अधिक आत्मपरीक्षण करावे लागेल.

COMMENTS