Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजपने फुंकले रणशिंग

राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार असल्या तरी, काल रविवारीच भाजपने कार्यकर्त्यांच्या शिडात चांगलीच हवा भरत प्रचाराचे रणशिंग फुं

दहशतवादाचा बिमोड करण्याचे आव्हान
मणिपूर हिंसाचार आणि दहशतवादी हल्ला
अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणि हिंडनबर्ग

राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार असल्या तरी, काल रविवारीच भाजपने कार्यकर्त्यांच्या शिडात चांगलीच हवा भरत प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. खरंतर महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र या पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे भाजपचे स्वप्न आहे. ते वास्तवात उतरण्यासाठी भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना उत्साह, चेतना देण्याचे काम या मेळाव्यातून केल्याचे दिसून येत आहे. खरं पाहिल्यास लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले, त्या यशाचे शिल्पकार खासदार शरद पवार आहेत, हे महायुतीला चांगलेच ठावूक आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविरोधात आघाडी उघडल्यास आपण यशस्वी होवू असेच भाजपचे गणित दिसून येते. त्यामुळे काल झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अमित शहा यांनी शरद पवारांना भ्रष्टाचार्‍यांचे सरदार अशी उपमा देत त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेशाची वाट न पाहता थेट मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. विरोधक खोटे नरेटिव्ह तयार करत आहेत, त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा भाजपविरोधात गेल्याचे दिसून आले. याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये पडलेली उभी फूट आणि त्याच सहानुभूतीच्या लाटेचा महाविकास आघाडीला झालेला फायदा. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत होणार नाही, याची काळजी भाजप घेतांना दिसून येत आहे.

त्यामुळेच भाजपने पुण्यात मेळावा घेत पुन्हा एकदा भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारण गतीमान होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना, महिलांना बसमधील प्रवासात 50 टक्के सूट, लाडका भावाला विद्यावेतन सारख्या प्रभावी योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यातून महायुती पुन्हा एकदा आपला मतदार आकर्षित करण्याच इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपने एकप्रकारे पुण्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी, जागावाटपावरून अजूनही तोडगा निघाल्याचे दिसून येत नाही. तसेच अजित पवार महायुतीसोबतच राहील की, नाही, यावर देखील शंका आहे. कारण अजित पवारांना सोबत घेतल्यमुळेच भाजपला मोठा फटका बसल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढला आहे. त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडावे, यासाठी पोषण वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामागचे गणित असे आहे की, महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास, जागा वाटपाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार गटाने किमान 80 जागा मिळाव्यात अशी मागणी करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील 80-90 जागा मिळाव्यात अशी मागणी करतांना दिसून येत आहे. तर भाजपच 150-160 जागांवर लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे जागावाटपांच्या गणितावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. त्यापेक्षा अजित पवारच जर महायुतीतून बाहरे पडल्यास जागा वाटपाचे गणित देखील सोपे होईल, आणि अजित पवारांनी स्वबळावर जर काही जागा निवडून आणल्यास त्यांना निवडणूक निकालानंतर पुन्हा महायुतीत सहभागी करून घेता येईल, असेच गणित दिसून येत आहे. मात्र या जर-तरच्या शक्यता आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय समीकरणे जुळतात, यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बरेच राजकीय गणिते बदलू शकतात. 

COMMENTS