Homeताज्या बातम्यासंपादकीय

भागवतांचे पापक्षालन तर पवारांचे सौ चुहे खाके…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमादरम्यान वक्तव्य करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तात्विक चर्चेचा आरंभ केला आ

राज्यांच्या आवाजाचा एल्गार !
झारखंड सभागृहातील गूंज !
सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमादरम्यान वक्तव्य करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तात्विक चर्चेचा आरंभ केला आहे. मोहन भागवत यांनी वज्रसूची टंक या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना अस्पृश्यता आणि जातीभेद यावर प्रकट भाष्य करत, या संदर्भात ब्राह्मणांनी पापक्षालन करावं, या शब्दात त्यांनी माफी याचना करण्यापर्यंतचा भाग आपल्या वक्तव्यातून व्यक्त केला. त्यांच्या मते, सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा भाग होता. सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी त्या त्या धर्माच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्चनीचतेला, अस्पृश्यतेला किंवा असमानतेला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. जातीभेदाचे कधीही समर्थन करता येणार नाही. मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी अशा पद्धतीने आपण म्हणजे ब्राह्मणांनी चुका केल्याने, त्याविषयी आता आपण आपली चूक कबूल करायला हवी, एवढ्या स्पष्ट शब्दात त्यांनी भाष्य केले. अर्थात, कथनी आणि करणी यात मोहन भागवत हे समता आणतील, अशाप्रकारची अपेक्षा त्यांच्या वक्तव्यावरून करायला हरकत नाही. इतिहासात झालेल्या चुकांची कबुली देणं ही महान गोष्ट आहे. त्यांच्या या वक्तव्याचे आम्ही स्वागत आणि अभिनंदनही करतो. त्यांचे वक्तव्य हे भारतीय समाजात अतिशय खोलवर रूजलेल्या जातीव्यवस्थेविषयी असल्याने त्यावर चर्चा होणे कोणालाही टाळता येणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी देखील टीका केली आहे. दवे यांच्या टिकेविषयी आम्ही काही बोलणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार आणि जयंत पाटील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जी टीका केली, ती म्हणजे सौ चुहे खाके, बिल्ली चली हजको, असाच प्रकार म्हणावा लागेल. शरद पवार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे स्वागत केले असले तरी ते व्यवहारात आणण्याचे आवाहन केले आहे. शरद पवारांचे हे वक्तव्य वस्तुस्थिती लपवणारे आहे. महाराष्ट्रात सामाजिक अत्याचाराचा ताजा इतिहास जो स्वातंत्र्योत्तर काळाचा असेल; तो शोधला तर ग्रामीण भागातील जातीय अत्याचार करणाऱ्यांमध्ये पवारांच्या जातीबांधवांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे, ज्या चुकांसाठी मोहन भागवत पापक्षालन करू पाहतात, त्या गोष्टी प्रत्यक्ष घडविण्यात जो जातीवाद ग्रामीण भागात दिसतो त्यास राज्यकर्ते म्हणून अभय देणारे कोण? याचा जाबही शरद पवार यांनी द्यायला हवा. इतरांकडे बोटं दाखवताना चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात, याचं भान सुटू देऊ नये. त्याच पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. जयंत पाटील यांना आम्ही आठवण करू देऊ इच्छितो,  की, तुम्ही लोकशाहीच्या राज्यातील अतिशय पवित्र आणि सर्वोच्च सभागृहात बोलताना, तत्कालीन अध्यक्षपद भूषविणाऱ्या उपाध्यक्षांच्या थेट जमातीचा उल्लेख केला होता. हा उल्लेख म्हणजे तुमच्या डोक्यात असणाऱ्या जातीय अहंकाराचा स्पष्ट संकेत होता. जातीव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना आपली बाजू किती नैतिक आहे, याचे भान ठेवूनच प्रतिक्रिया द्यायला हव्या. कोणत्याही भेदनितीचे समर्थन म्हणजे माणसातील पशुत्व ठरते. मानवी समाज जितका सभ्य असेल, तितका तो निती-नियमांच आचरण करतो. आपल्या चुकांची जाणीव होणं हे सभ्य समाजाचे लक्षण मानायला हवे. सभ्य समाजातच कायदे – नियम बनवले जातात आणि पाळलेही जातात. मोहन भागवत यांनी आपल्या वक्तव्यातून ब्राह्मण समाजाकडे घेतलेला वस्तुस्थितीयुक्त दोष म्हणजे सभ्य समाजाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. यावर चर्चा होत राहील आणि झाली सुध्दा पाहिजे.

COMMENTS