सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून, मंगळवारी सोलापुरात महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्र
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून, मंगळवारी सोलापुरात महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी, सरकार महायुतीचेच येणार आहे. त्यामुळे सावत्र भावांनी कितीही प्रयत्न केले तरी, आम्ही लाडकी बहीण योजनेसह तत्सम कोणतीही योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकार 1500 रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत असल्याचा आरोपही फेटाळला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊनी जन्मलेल्या आमच्या या बहिणीला या पैशांचे मोल केव्हाच समजणार नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले, सोलापूरच्या आमच्या एका बहिणीने आमच्यावर पैशांची लाच देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा आरोप केला. आईचे प्रेम, बहिणीचे प्रेम, मुलीचे प्रेम जगाच्या पाठीवर कुणाला विकत घेता आले? प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचे मोल तो करू शकत नाही. जगातील सर्व संपत्ती दिली तरी प्रेम विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, त्यांना हे कळत नाही. तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले. पण माझ्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी हिशेबाची जुळवणी करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, पैशांअभावी ठरवलेल्या काही 4 गोष्टी करता येणार नाहीत. त्या बहिणींना हे 1500 रुपये काय आहेत हे विचारा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला माझ्या सोलापूरच्या बहिणीला या पैशांचे मोल कळणार नाही. तिला माझ्या या सर्वसामान्य बहिणींचे दुःख केव्हाच समजणार नसल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. फडणवीस यांनी यावेळी लाडकी बहीण योजना रद्द करण्याच्या मुद्यावरून विरोधकांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधकांनी सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजना रद्द करण्याचा इशारा दिला. अरे वेड्यांनो, ज्यांच्यामागे एवढ्या बहिणी आहेत, त्यांचेच सरकार येणार आहे. तुमचे सरकारच येणार नाही. मग तुम्ही रद्द तरी काय करणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक सहकारी या योजनेविरोधात नागपूरच्या हायकोर्टात गेला. तिथे त्यांनी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा योजना, मोफत उच्च शिक्षण, मोफत एसटी प्रवासाची योजना बंद करण्याची मागणी केली. या योजनांमुळे सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला. पण आमचे सरकार काहीही झाले तरी या योजना बंद करणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
COMMENTS