डोशातील चटणीला आक्षेप घेतल्याने मारहाण..तिघांना सक्तमजुरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोशातील चटणीला आक्षेप घेतल्याने मारहाण..तिघांना सक्तमजुरी

अहमदनगर/प्रतिनिधी : स्पंज डोशासमवेत दिलेली चटणी खराब असल्याचे सांगितल्याच्या रागातून दोघांना बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी किशोर संजय भागानगर

अवजड वाहने करतात नगरमध्ये वाहतूक कोंडी
पराभव झाला तरी खचून जावू नका ः डॉॅ. सुजय विखे
राज्यात उष्माघाताचे चार बळी

अहमदनगर/प्रतिनिधी : स्पंज डोशासमवेत दिलेली चटणी खराब असल्याचे सांगितल्याच्या रागातून दोघांना बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी किशोर संजय भागानगरे (वय 33), अक्षय संजय भागानगर (वय 28) व संजय दत्तात्रय भागानगरे (वय 56) यांना जिल्हा न्यायाधीश कुर्तडीकर यांनी भा.द.वि. कलम 326 प्रमाणे दोषी धरून 3 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद आणि भा.द.वि. कलम 324 प्रमाणे दोषी धरून 2 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 2 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.
8 सप्टेंबर 2017 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अतुल सुभाष वाघचौरे व त्याचा मित्र धीरज भगवान रोहोकले असे दोघेजण चौपाटी कारंजा येथे सिध्देश्‍वर उडपी सेंटर या गाडीवर स्पंज डोसा खाण्यासाठी गेले होते. त्यांनी अक्षय संजय भागानगरे यास खाण्यासाठी दोन स्पंज डोसे मागितले. वाघचौरे व त्याचा मित्र तो डोसा खात असताना त्यांना असे जाणवले की त्यातील बटाट्याची चटणी विटलेली असून त्यामुळे डोसा खराब लागत आहे. त्यामुळे वाघचौरे त्याला म्हणाला की, डोशातील चटणी खराब झाली असून तिला वास लागला आहे. त्यामुळे डोसा खाण्यास खराब लागत आहे. हवं तर तू खाऊन बघ. तेव्हा तो म्हणाला, मी काय तुझा उष्टा डोसा खाऊ काय? त्यानंतर वाघचौरे भागानगरेला म्हणाला की, तुझ्याकडे असलेल्या डोश्यातील चटणी खा, मग तुझ्या लक्षात येईल. वाघचौरेच्या या बोलण्याचा भागानगरेला राग आल्याने त्याने वाघचौरे व त्याच्या मित्राला शिवीगाळ व हमरीतुमरी केली. किशोर संजय भागानगरे याने हातातील लोखंडी कवचा वाघचौरेच्या डोक्यात मारला असता त्याच्या डोक्याला दुखापत झाली. संजय भागानगरे याने लाकडी दांडक्याने पाठीत मारहाण केली तसेच अक्षय याने त्याच्या नाष्टा सेंटरच्या गाडीमध्ये ठेवलेली तलवार काढली व वाघचौरे याचा मित्र धीरज याचे डोक्यावर तलवारीचा वार केला. त्यामुळे धीरज याच्या डोक्यास दुखापत झाली. तसेच किशोर याने चाकू धिरज याच्या उजव्या दंडावर मारल्यामुळे दुखापत झाली. वाघचौरे व जखमी धिरज यांच्यावरील उपचारादरम्यान फिर्यादीचा जबाब नोंदवून त्या आधारे आरोपींविरूध्द तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादी तर्फे अ‍ॅड.सुहास टोणे व पैरवी अधिकारी पोलिस हवालदार एम.ए.थोरात यांनी सहकार्य केले.

COMMENTS