Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीतील बंदला हिंसक वळण ; संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर तणाव

परभणी : परभणीमध्ये संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर बुधवारी शहरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी परभणी बंदला हिंसक वळण लागले होते. तसेच आंदोल

श्री संत जगनाडे महाराज ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत ः  आ. आशुतोष काळे
शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार

परभणी : परभणीमध्ये संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर बुधवारी शहरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी परभणी बंदला हिंसक वळण लागले होते. तसेच आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
पोलिस प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच शहरात अफवा पसरवून हिंसक वातावरण तयार होवू नये, यासाठी इंटरनेटदेखील बंद करण्यात आले होते, तरीदेखील पुन्हा दगडफेकीचे प्रकार बघायला मिळाले असून, पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती समोर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला. परभणी शहर बंद दरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परभणीतील सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी 1 वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे.

कुणाचा हात आहे का, चौकशी व्हावी : केंद्रीय मंत्री आठवले
संविधानाचा अपमान करणारा आरोपी पकडला गेला असून आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. तसेच या सर्व प्रकरणामागे कुणाचा हात आहे का? याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. मुख्यमंत्री या प्रकारांची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील, असेही आठवले म्हणाले.

..तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील : अ‍ॅड. आंबेडकर
परभणीतील घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून इशारा दिला आहे. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परभणीत मराठा जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्य घटनेची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा कार्याकर्त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनामुळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून एका समाजकंटकाला अटक केली. मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

COMMENTS