बहुजन संस्कृतीवर आर्य संस्कृतीची झालर !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

बहुजन संस्कृतीवर आर्य संस्कृतीची झालर !

    उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एक एप्रिल ते नऊ एप्रिल अशी सलग नऊ दिवस राज्यातील मांसविक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच

धक्कादायक…कंटेनरच्या धडकेत एस टी चालक ठार (Video)
वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांसाठी 100 घरे काँग्रेस बांधणार : राहुल गांधी
अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता


    उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एक एप्रिल ते नऊ एप्रिल अशी सलग नऊ दिवस राज्यातील मांसविक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून या आदेशाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या आदेशा मागील कारणमीमांसा सांगतांना त्यांनी १ एप्रिल ते ९ एप्रिल हे नऊ दिवस नवरात्रीचे दिवस असल्यामुळे यादरम्यान मांस केवळ पाहिले गेले तरी देखील उपवास भ्रष्ट होतो, अशा प्रकारचा एक अजब तर्क मुख्यमंत्री योगी यांनी लावलेला आहे. या नवरात्री दरम्यान सात्विक आहारच घेतला पाहिजे, असा एक सक्त आदेश हेही यातून स्पष्ट होतो. वास्तविक पाहता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हे प्राचीन इतिहास आणि संस्कृतीच्या संदर्भात अज्ञान आहे असे म्हणावे लागेल. नवरात्री हा महोत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो, तो म्हणजे दसऱ्याच्या नऊ दिवस आधी. दहाव्या दिवशी दसरा हा महोत्सव साजरा केला जातो. त्याच्या आधी नऊ दिवस नवरात्री महोत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा महोत्सव वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. खास करून पश्चिम बंगाल मध्ये हा महोत्सव दुर्गा महोत्सव म्हणून साजरा केला जातो; तर गुजरात सारख्या राज्यामध्ये गरबा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या नवरात्रीचे महत्व म्हणजे यात स्त्रियांचा सन्मान हा फार महत्वपूर्ण असा सांस्कृतिक भाग आहे. स्त्रियांच्या सन्मानाचा हा इतिहास खरे तर या देशातील प्राच्यविद्या  पंडितांनी ठळकपणे समोर आणलेला आहे. नवरात्रीचा महोत्सव हा खासकरून दसऱ्याच्या आधी म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतो. या काळात शेतीतील धनधान्य हे मोठ्या प्रमाणात पिकून खळ्यात किंवा मळ्यात संग्रही असते आणि शेतात भरभरून पिकलेल्या त्या पिकांचा आनंदोत्सव म्हणून साजरा होतो, तो या नवरात्रीच्या काळात. नवरात्री महोत्सव खासकरून कृषी क्षेत्राचा महोत्सव आहे म्हणजे शेतीमध्ये पिकलेल्या धनधान्य याचा शेतकऱ्यांनी आनंद साजरा करण्याचा हा उत्सव आहे. शेतीचा शोध हा प्रामुख्याने निॠत्तीने लावल्याचा प्राच्य इतिहास समोर आलेला आहे. शेती, ज्याला आपण कृषी म्हणतो आणि कृषी याचा अर्थ स्त्रियांशी संबंधित होता.  ऋषी त्यांनाच म्हटले जायचे जे ऋचा रचायचे. ऋचा म्हणजे शेतीच्या संदर्भातली रचलेली कवनेच होती. ही कवणे खास करून स्त्रिया रचत असत कारण शेतीचा शोध हा स्त्रियांनीच लावलेला असल्यामुळे स्त्रिया या संदर्भात आपले महोत्सवाची गाणी यातूनच तयार करीत असत. हा नवरात्री चा महोत्सव साजरा करण्यासाठी तंत्र पद्धतीने महिला तो साजरा करीत. तंत्र याचा अर्थ प्रत्यक्षात शेती कसण्यासाठी आणि शेतीतून पीक उगवण्यासाठी जी प्रक्रिया केली जायची त्या प्रक्रियेचा तंत्र म्हणून किंवा एक प्रायोगिक भाग. एका छोट्या  जागेवर किंवा एका छोट्या भांड्यामध्ये ते प्रतीकात्मक स्वरूपात करणं. अशा पद्धतीने नवरात्री महोत्सवात पहिल्याच दिवशी एका टोपलीत किंवा परडीत माती घेऊन, त्या मातीत धान्य पेरायचे. नऊ दिवसापर्यंत त्याला पाणी देत ते झाकून ठेवायचे. नवव्या दिवशी ते धान्य पिकून ज्या पद्धतीने बहरते ते नवव्या दिवशी बाहेर काढून दहाव्या दिवशी त्याचा उत्सव साजरा करायचा, अशा पद्धतीची ही सांस्कृतिक रचना आहे. या उत्सवात नऊ दिवस किंवा नवरात्री यासाठी अभिप्रेत आहे की शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्यामुळे शेतीतून जसे पीक बहरते त्याच पद्धतीने एक स्त्री नऊ महिन्यापर्यंत आपल्या गर्भात बाळ सांभाळते. कृषी आणि स्त्री यांच्या जीवनाचा समान भाग म्हणून हा प्रतीकात्मक गाभा नवरात्री उत्सव म्हणून तत्कालीन स्त्रियांनी सुरू केला. आजही तो भारतीय समाजाच्या जाणत्या – अजाणत्या सांस्कृतिक जीवनामध्ये समाविष्ट आहे. या देशातील शेती संस्कृती ही या देशातली बहुजनांची संस्कृती आहे आणि सात्विक आहार देखील बहुजनांनी या देशात निर्माण केलेला आहे. या देशात आर्यांचे आगमन झाल्यानंतरच मांसाहार करण्याची पद्धतीही भारतीय उपखंडात रुजली. त्यामुळे हिंदू धर्माच्या नावाखाली बहुजनांच्या संस्कृतीचा काळ बदलणे आणि त्यावर अतिक्रमण करून  आर्य संस्कृतीची झालर बहुजनांच्या संस्कृतीवर चढवणं, हा सांस्कृतिक प्रतिक्रांती चा ही भाग आहे, असे स्पष्टपणे नमूद करावे लागेल.

COMMENTS