पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.बाबुजी आव्हाड यांनी दूरदृष्टी ठेवत सर्वप्रथम तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगो
पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.बाबुजी आव्हाड यांनी दूरदृष्टी ठेवत सर्वप्रथम तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणली त्यांचे तालुक्याच्या राजकारण व समाजकारणामध्ये खूप मोठे योगदान होते असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त तसेच महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष एड सुरेशराव आव्हाड, माजी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, विश्वस्थ नंदकुमार शेळके, महावीर मुनोत, विष्णुपंत अकोलकर,संदीप पठाडे, धनंजय बडे प्राचार्य डॉ बबन चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, अरविंद पारगावकर, प्राचार्य प्रा जी बी आघाव, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, प्राचार्य डॉ शिवाजीराव भोर, रामनाथ फुंदे आदी उपस्थित होते. मोनिकाताई राजळे पुढे म्हणाल्या, बाबुजींनी पाथर्डीच्या २५ एकर माळरानावर उसतोडणी कामगारांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे हा उदात्त हेतू ठेऊन पार्थ विद्या प्रसारक मंडळाअंतर्गत सन १९६६ मध्ये जनता महाविद्यालयाची स्थापना केली. संस्थेच्या यशामध्ये कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग असतो.सन्मानित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बाबुजींचा वारसा समर्थपणे पुढे चालविला.गुणवंत कर्मचाऱ्यामुळेच संस्थेला चांगली ओळख निर्माण होते.बाबुजींनी त्यांचे समकालीन सहकारी दादापाटील राजळे, रामभाऊ अकोलकर यांच्याबरोबर काम करून पाथर्डी तालुक्याला वेगळी दिशा देण्याचे काम केले.बाबुजींनी स्थापन केलेल्या संस्थेची यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याचे काम अभय आव्हाड करत असून ही संस्था एक आगळीवेगळी संस्था म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात नावारुपास आली आहे. माजी प्राचार्य प्रा जी बी आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संस्था बाबुजींनी कशा पद्धतीने सुरु ठेवली याविषयी सविस्तर विवेचन केले.ते म्हणाले, १९८० च्या दशकात महाविद्यालय सुरु ठेवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बाबुजी यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांचे ग्रंथालयावर विशेष प्रेम होते. कर्मचाऱ्यांशी त्यांचे अतिशय आपुलकीचे नाते होते. ही शिक्षणसंस्था आपली आहे व याठिकाणी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपला मुलगा आहे या भावनेतून सर्व शिक्षकांनी काम करावे हा विचार त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये रुजविला. सामान्य व्यक्ती आपल्या सभोवतालचा विचार करते परंतु असामान्य व्यक्ती नेहमी दुरदृष्टीचा विचार करतात. हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे बाबुजी होत असे ते शेवटी म्हणाले. यावेळी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक आर टी वामन, मुख्याध्यापक प्रा अरविंद पारगावकर, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, प्रा रमेश मोरगावकर, मुख्याध्यापिका प्रा शीला फुंदे, प्राचार्या डॉ उज्वला जाधव, डॉ एच जी जमाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेतील २८ सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख कॅप्टन डॉ अजयकुमार पालवे यांच्या भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, सुत्रसंचालन डॉ अशोक कानडे तर आभार प्रा शेखर ससाणे यांनी मानले.
COMMENTS