अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास अपघात होऊन वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करण्यासाठी चाललेल
अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास अपघात होऊन वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करण्यासाठी चाललेल्या बाप-लेकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात घडली. रावसाहेब हिरू वडते (वय 57) व गणेश रावसाहेब वडते (वय 30, रा. नागलवाडी, ता.शेवगाव) असे अपघातात मरम पावलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडते कुटुंब हे गरीब असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे राहणारे हे कुटुंब ऊस तोडणीसाठी नगर येथे आले होते. त्यांना नगरच्या जवळपास काम मिळणार होते. त्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमाराला हे दोघे बाप-लेक त्यांच्या मोटरसायकलवरून पुण्याच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनावरील वाहन चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. कोतवाली पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने आंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अंधारामुळे यापूर्वीही छोट्या-मोठया अपघाताच्या अनेक घटना या रस्त्यावर घडल्या आहेत.
COMMENTS