Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भी.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार राजमाने, खिलारी, माने, पाटेकर, बोर्‍हाडे, डॉ.तारू यांना जाहीर

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथील भी. ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणार्‍या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली अस

बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
पाच जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथील भी. ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणार्‍या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये रवी राजमाने (येळावी, सांगली) विठ्ठल खिलारी (शेनवडी, सातारा) महादेव माने (खंडोबाची वाडी, सांगली) ऐश्‍वर्य पाटेकर (नाशिक), तान्हाजी बोर्‍हाडे (कानसे, पुणे) व डॉ. देविदास तारू (नांदेड) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भी. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली.
याप्रसंगी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, संदीप रोहमारे, अ‍ॅड. राहुल रोहमारे व प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते. भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे 1989 पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी 2023 या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मव्हटी-रवी राजमाने (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून, सवळा-विठ्ठल खिलारी (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून, वसप-महादेव माने (ग्रामीण कथासंग्रह, ग्रंथाली प्रकाशन, माहीम, मुंबई), कासरा-ऐश्‍वर्य पाटेकर (ग्रामीण कविता संग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) विभागून, जळताना भुई पायतळी – तानाजी बोर्‍हाडे (ग्रामीण कविता संग्रह, काव्यग्रह प्रकाशन, वाशिम) विभागून, आता मव्हं काय – डॉ. देविदास तारू (ग्रामीण आत्मकथन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे) यांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख रुपये 15000/- स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कादंबरी या व कविता संग्रह या साहित्यप्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण 60 साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. शिरीष लांडगे, श्री. लक्ष्मण बारहाते, डॉ. विजय ठाणगे, डॉ. जिभाऊ मोरे व डॉ. गणेश देशमुख यांच्या संयुक्त निवड समितीने केले. वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने जखडण (भीमराव वाघचौरे), ओवाळणी (हरिश्‍चंद्र पाटील), बयनामा (बा.बा. कोटंबे), हंबरवाटा(संतोष आळंजकर), काळजाचा नितळ तळ(भीमराव धुळुबुळू), पांडुरंगाच्या देशा(डॉ. सदानंद भोसले), ग्रामीण साहित्य चळवळ (डॉ. वासुदेव मुलाटे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे. 7 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथे केले जाणार आहे. या पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास रसिक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अ‍ॅड्. संजीव कुलकर्णी व प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले आहे.

पुरस्काराचे 36 वे वर्ष
कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून 1989 पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे हा यामागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे यांनी केले. सदर पुरस्कार वितरणाचे हे 35 वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे 36 वे वर्ष आहे. आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील 177 पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे.

COMMENTS