Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यसभेसाठी आठवले, तावडे, यांना संधीवडकुते, इवनाते या नव्या चेहर्‍यांना भाजपकडून उमेदवारी

नवी दिल्ली ः राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत महाराष्ट्रातील चार नावांवर शिक्कामोर्

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टची मुदत 10 वर्षाची करावी
नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी
Displaying Aathwale tavde rajyasabha.jpg

नवी दिल्ली ः राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत महाराष्ट्रातील चार नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 5 मार्च आहे. त्यानंतर छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल.
भाजपच्या विश्‍वासू नेत्यांपैकी एक असणारे विनोद तावडे यांना पक्षाने संधी दिली असून, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत काहीशी अनिश्‍चितता होती. मात्र भाजपने आपल्या कोट्यातून त्यांना सलग तिसर्‍यांदा संधी देत मित्रपक्षांशी असलेली बांधिलकी दाखवली आहे.  हिंगोली जिल्ह्यातील माजी आमदार रामराव वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. विविध पक्षांतून राजकीय प्रवास करत त्यांनी शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामीण आणि पशुपालक समाजातील प्रश्‍नांना संसदेत आवाज मिळावा, या दृष्टीने त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येतो. माया इवनाते या आदिवासी समाजातील सक्रिय नेत्या असून त्या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगावर त्यांनी काम केले आहे. त्यांना उमेदवारी देत आदिवासी समाजातील नेतृत्वाला बळ देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. विदर्भातील राजकीय समीकरणातही या निर्णयाला महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. त्यामुळे नव्या निवडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार भाजपला चार जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते, अशी चर्चा आहे. प्रत्येक उमेदवारासाठी 37 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. चौथी जागा सुरक्षित करण्यासाठी भाजपला अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचे समर्थन आवश्यक ठरणार आहे.

COMMENTS