अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या खड्डेयुक्त रस्त्यांचे भाग्य बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी पावसामुळे ही खड्डे दुरुस्ती लांबणीवर पडली होती. आता पाऊस नसल
अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या खड्डेयुक्त रस्त्यांचे भाग्य बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी पावसामुळे ही खड्डे दुरुस्ती लांबणीवर पडली होती. आता पाऊस नसल्याने ती अपेक्षित होती. पण आता डांबराचे भाव वाढल्याने पूर्वीच्या दरात ही दुरुस्ती वा नव्या डांबरी रस्त्यांची कामे परवडत नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मनपाच्या स्थायी समितीला याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
नगर शहरातील मध्य वस्तीतील व सावेडी-केडगावसह अन्य उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था वर्णन करण्यापलीकडे गेली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची जवळपास सवयच नगरकरांना झाली आहे. विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी या खड्ड्यांविरोधात आवाज उठवला व आंदोलनेही केली. पण सतत पडत असलेल्या पावसाचे कारण देत मनपाने त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यानंतर ऑक्टोबर अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्यावर डिसेंबरमध्ये रस्त्यांची डागडुजी सुरू होण्याची तसेच नव्या रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे सुरू होणे अपेक्षित होते. पण डांबराचे दर वाढल्याने पूर्वीच्या किमतीत आता खड्डे दुरुस्ती वा नवे रस्ते करण्याची कामे परवडत नाहीत, अशी भूमिका ठेकेदारांनी आहे. त्यामुळे हा दरवाढीचा तिढा जोपर्यंत मनपाची स्थायी समिती धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवत नाही, तोपर्यंत रस्त्यांतील खड्डे तसेच राहणार आहेत व रस्त्यांची नवी कामेही केवळ कागदावरच राहणार आहेत.
तीन रस्त्यांचे प्रस्ताव
सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाईपलाईन व तारकपूर रस्त्यांचे रुंदीकरणासह मजबुतीकरणाच्या कामाच्या निविदा अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीला प्राप्त झालेल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची सभा घेऊन या निविदांना मंजुरी दिली जाईल, असे स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी सांगितले. डांबराच्या दरात वाढ झाल्याने रस्त्यांच्या कामात ठेकेदारांनी दरवाढीची मागणी केल्याने पेच निर्माण झाला आहे. गुलमोहोर रोड, पाईपलाईन व तारकपूर या रस्त्यांची कामे मनपाच्या स्वनिधीतून करण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणासाठी ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. या निविदा अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आलेल्या आहेत. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने मनपा अतिक्रमण विभागाकडून काही दिवसांपूर्वीच गुलमोहोर व अन्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली आहेत. तर अनेक नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करून दिला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर गुलमोहोर, पाईपलाईन व तारकपूर हे रस्ते उजळणार आहेत. पण त्याआधी डांबर दरवाढीचा तिढा मनपाला सोडवावा लागणार आहे.
स्थायीच्या निर्णयावर अवलंबून
ठेकेदार संस्थांनी अंदाजपत्रकातील दरानुसार काम करण्यास तयार असल्याचे पत्र दिले. पण, त्याचबरोबर डांबराच्या दरात वाढ झाल्याने ठेकेदारांनी वाढीव दराच्या निविदांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केलेली आहे. डांबराचे अंदाजपत्रकीय दर प्रतिटन 38 हजार रुपये असून 1 डिसेंबरपासूनचे नवे दर 55 हजार प्रति टन इतके आहेत. या दरवाढीने ठेकेदारांनीही तशी दरवाढ मिळण्याची मागणी केल्याने नवा पेच निर्माण झालेला आहे. स्थायी समिती यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS