कर्जत : दिव्यांग व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून जमिनीची खरेदी-विक्री केली, म्हणून न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल के
कर्जत : दिव्यांग व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून जमिनीची खरेदी-विक्री केली, म्हणून न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.
पांडुरंग केरु गजरमल (रा. पुणे) हे दिव्यांग असून त्यांना इतरांच्या मदतीशिवाय हालचाल करता येत नाही. त्यांची जमीन कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील गट क्रमांक 240 मध्ये आहे. याची पूर्ण माहिती असलेले भैय्या दिलीप कांबळे, योगेश लोणकर, उत्तम विठ्ठल रंधवे ( तिघेही रा. भांबोरा), बाळू भानुदास काळे व अल्लाउद्दिन कमाल शेख ( दोघे रा. राक्षसवाडी बुद्रुक) यांनी संगणमत करून कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट व्यक्ती उभा करून गजरमल यांच्या नावावर सिद्धटेक येथील सेंट्रल बँकेमध्ये बनावट खाते उघडले. तसेच बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्र तयार करून 2. 02 हेक्टर जमीन कुशल ओंकार शितोळे यांच्यासाठी ओंकार रामराव शितोळे ( रा. मोशी, जि. पुणे) यांना विकण्यात आली. यासाठी बिनताबा साठेखत व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र असे दोन खोटे बनावट दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात 8 डिसेंबर 2023 रोजी तयार केले. नंतर ओंकार शितोळे यांचा मुलगा कुशल शितोळे यास विक्री केल्याचे दस्त बनविले. यात गजरमल यांच्या जमिनीची किंमत 13 लाख 90 हजार रुपये दाखवून खरेदी करून सर्व रक्कम घेऊन फसवणूक केली. या खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये उत्तम विठ्ठल रंधवे हाच पांडुरंग गजरमल असल्याचे भासवून त्याच्या नावे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केल्याचे व बँकेत खाते उघडून फसवणूक केली आहे. ही घटना पांडुरंग गजरमल यांना 8 जानेवारी 2024 रोजी कर्जत तहसील कार्यालयात कामानिमित्त आले असताना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन याबाबतच्या दस्ताच्या साक्षांकित प्रती मिळवल्या. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पांडुरंग गजरमल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन गजरमल यांच्या बाजूने निकाल देत भैय्या कांबळे, योगेश लोणकर, बाळू काळे, अल्लाउद्दीन शेख, उत्तम रंधवे यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मात्र, गुन्हा होऊनही आरोपी भांबोरा व राक्षसवाडी परिसरात मोकाट फिरत असून पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असे पांडुरंग गजरमल यांनी म्हटले आहे.
COMMENTS