अपघाताची फिर्याद न घेतल्याने शेवगाव एसटी आगार बेमुदत बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघाताची फिर्याद न घेतल्याने शेवगाव एसटी आगार बेमुदत बंद

अहमदनगर/प्रतिनिधी : शेवगाव डेपोच्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओहरटेक करताना डॅश मारून एसटी बसचे नुकसान केल्याची फिर्याद घेण्यास राजकीय पदाधिकार्‍यांच

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार
श्रीगोंदा-मांडवगण रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट
आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश

अहमदनगर/प्रतिनिधी : शेवगाव डेपोच्या एसटी बसला चुकीच्या बाजूने ओहरटेक करताना डॅश मारून एसटी बसचे नुकसान केल्याची फिर्याद घेण्यास राजकीय पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ शेवगाव आगारातील चालक-वाहकांनी शेवगाव बस आगार बंद केला आहे. याबाबत माहिती अशी की, मंगळवारी शेवगाव आगाराची शेवगाव-गेवराई बस चापडगाव येथे आरोग्य केंद्राजवळ प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेली असताना चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणार्‍या डबल ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरचा कट एसटी बसला लागला.
ट्रॉलीच्या हेलकाव्यात बसच्या डाव्या बाजूचा आरसा फुटून बसला नुकसान झाले. याबाबत चालकाने शेवगाव पोलिस ठाण्यात संबंधित ट्रॅक्टर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार अर्ज दिला. मात्र, पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल केला नाही, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी दिलीप लबडे यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत आगाराचे कर्मचारी गुन्हा दाखल करावा किंवा किमान तक्रार अर्ज घ्यावा म्हणून शेवगाव पोलिस ठाण्यात थांबले होते. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने याचा निषेध म्हणून शेवगाव आगाराच्या चालक-वाहकांनी रात्रीपासूनच एसटी बस आगार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लबडे यांनी सांगितले. एसटी बसला डॅश मारणारा ट्रॅक्टर हा शेवगाव तालुक्यातील एका राजकीय पदाधिकार्‍याच्या नातेवाईकांचा असल्याची चर्चा असून त्यामुळे पोलिसांनी राजकीय दाबावातून ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल न केल्याची चर्चा आहे. दुपारपर्यंत पोलीस तक्रार अर्ज दाखल करून घेण्यास अनुकूल होते. मात्र, नंतर नेमकी काहीतरी चक्रे फिरली आणि पोलिसांनी तक्रार अर्ज नाकारत गुन्हा दाखल केला नाही, असे बोलले जाते. मात्र, जोपर्यंत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत शेवगाव बस आगार शंभर टक्के बंद ठेवण्यात येणार असल्याचे लबडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य सरकारमधे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी दिवाळीपासून राज्यातील बहुतांशी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. अशात काही मोजके चालक-वाहक कामावर हजर झाल्याने शेवगावला तुरळक बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना तेवढाच आधार असताना प्रवाशांच्या सेवेला पुन्हा नव्या आंदोलनाने ग्रहण लागले आहे.

COMMENTS