अंबाजोगाई प्रतिनिधी - फकिराकार, अण्णाभाऊं साठे हे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले एक अनमोल रत्नच होय असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
अंबाजोगाई प्रतिनिधी – फकिराकार, अण्णाभाऊं साठे हे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले एक अनमोल रत्नच होय असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी काढले आहे.ते आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त त्याना अभिवादन करतांना बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला.त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीत झाले. मुंबईत सुरवातीला त्यांनी मिळेल ती कामे केली नंतर त्यांना मुंबईतील गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तिथेच त्यांना कामगारांच्या कष्टमय, दुःखमय जीवनाचे दर्शन झाले. कामगारांचे, संप, मोर्चे पाहून त्यांनी त्यांचा लढाऊपणाही अनुभवला.
कामगार नेते श्रीपाद डांगे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनले.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ऐकली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते इतके प्रभावीत झाले की त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानले. वडीलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी पडली . त्यामुळे त्यांना तमाशाच्या फडात काम करावे लागले. मुंबईत आल्यावर लोकशाहीर म्हणून ते नावारूपास आले. 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, लोकनाट्ये यांचा समावेश असे. महाराष्ट्राची परंपरा, मुंबई कोणाची ? ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्ये खूप गाजली. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, यासारखी त्यांनी लिहिलेली अनेक वगनाट्य लोकप्रिय झाली. त्याचबरोबर अण्णाभाऊंनी 35 कादंबर्या लिहिल्या. चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, रानगंगा, चिखलातील कमळ, वैजयंता या त्यांनी लिहिलेल्या कादंबर्या खूप गाजल्या. फकिरा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. जो व्यक्ती अवघे दीड दिवस शाळेत गेला त्या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कारच असल्याचे मोदी म्हणाले. जग बदल घालुनी घाव ! सांगून गेले मज भीमराव ! हे त्यांचे गीत खूप गाजले. माझी मैना गावाकडं राहिली. ही त्यांची लावणी अविस्मरणीय अशी ठरली. वास्तव लिहिणारा साहित्यरत्न 18 जुलै 1969 रोजी कालवश झाले. आज त्यांची 103 वि जयंती संपूर्ण देश साजरी करत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
COMMENTS