पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर माती, दगड व बुरूम उत्खननाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी काजारवाडी (खळे) ये
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर माती, दगड व बुरूम उत्खननाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी काजारवाडी (खळे) येथील अनिल बाबुराव काजारी यांनी गुरुवार, दि. 1 जानेवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
पाटण तालुक्यातील सलतेवाडी, मत्रेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व त्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत तहसीलदार कार्यालयाकडे माहिती मागवूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे काजारी यांनी सांगितले.
उत्खननासाठी आवश्यक असलेली रॉयल्टी चलने, मूळ मालकाची संमती, वाहतूक परवाने तसेच तहसीलची मंजुरी यासंबंधी कोणतीही कागदपत्रे संबंधित विभागाकडे उपलब्ध नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. यामध्ये संबंधित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांनी शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर उत्खननाला पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसीलदार कार्यालय, पाटण येथे आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही अनिल काजारी यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS