Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ एप्रिलपासून

’डीजीसीए’ चमू विमानतळाची करणार पाहणीअमरावती : अमरावती विमानतळाच्या उन्नतीकरणाला अखेर गती मिळाली असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर येथे ‘नाईट लँडिंग’ सुविध

मणिपूरमधील दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
पब्लिक रिलेशन्स काऊन्सिल ऑफ इंडियाची महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान
चक्क तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल

’डीजीसीए’ चमू विमानतळाची करणार पाहणी
अमरावती : अमरावती विमानतळाच्या उन्नतीकरणाला अखेर गती मिळाली असून, दीर्घ प्रतीक्षेनंतर येथे ‘नाईट लँडिंग’ सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक तांत्रिक साधनसामग्री बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित यंत्रणांनी मार्च अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास एप्रिल 2026 पासून रात्रीच्या वेळेत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाईट लँडिंगसाठी धावपट्टीवरील प्रकाशयोजना, नेव्हिगेशन प्रणाली, सुरक्षा मानके आणि नियंत्रण यंत्रणा यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था असलेल्या डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अधिकार्‍यांकडून पाहणी होईल. त्यानंतरच औपचारिक मान्यता दिली जाणार आहे.
सध्या अमरावती विमानतळावरून एटीआर-72 प्रकारातील प्रवासी विमाने नियमित उड्डाणे करत आहेत. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विमानतळाच्या विस्ताराची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून धावपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धावपट्टी विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, सर्वेक्षण, भूसंपादन आणि तांत्रिक बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. धावपट्टी विस्ताराच्या अनुषंगाने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलेपमेंट कंपनीकडून विविध पातळ्यांवर हालचाली सुरू आहेत. प्री-बीड बैठकीनंतर निविदा प्रक्रिया पुढे सरकली असून, अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर अपेक्षित आहे. प्रशासनाच्या सूत्रांनुसार, नाईट लँडिंग सुविधा आणि धावपट्टी विस्तार ही दोन महत्त्वाची कामे येत्या काही महिन्यांत पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती विमानतळाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार नसून, तो संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक घडामोडींना नवी चालना देणारा ठरू शकतो. रात्रीची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापारी व्यवहार, औद्योगिक गुंतवणूक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणांसाठी होणारी प्रवासाची सोय अधिक सुलभ होईल. विशेषतः उद्योग क्षेत्राला जलद हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

COMMENTS