छ. संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे

छ. संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दानवे यांना दूरध्वनी करून धमकी दिली. संभाषणादरम्यान धमकी देणार्या व्यक्तीने अत्यंत आक्रमक भाषा वापरत ठोकून काढू आणि कापून टाकू अशा शब्दांत जीव घेण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते. या प्रकारानंतर दानवे यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दानवे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच धमकी देणार्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित दूरध्वनी क्रमांकाचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून तो कॉल नेमका कुठून करण्यात आला, कोणत्या व्यक्तीने केला आणि त्यामागे कोणाचा हात असू शकतो याचा शोध घेतला जात आहे. यासाठी तांत्रिक तपासाची मदत घेतली जात असून सायबर गुन्हे शाखेलाही या तपासात सहभागी करण्यात आले आहे.

COMMENTS