Homeताज्या बातम्यासंपादकीय

आधीच क्रिमी लेयरचे ग्रहण, त्यात भंपक डॉक्टरचा स्टंट !

भारतीय समाज विषम जातीव्यवस्थेने ग्रस्त असून, या सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला आहे. हा मार्ग प

थेट निवडणूकीत ओबीसी सरपंच किती ?
मुंबईतील महामोर्चा !
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 

भारतीय समाज विषम जातीव्यवस्थेने ग्रस्त असून, या सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला आहे. हा मार्ग प्रशस्त करण्याऐवजी आरक्षणधारी समाजाला कमकुवत करून, आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारे समोर येत आहे. अशाच प्रकारचे एक षडयंत्र मुंबईतील एका तथाकथित ओबीसी डॉक्टरांच्या नेतृत्वामध्ये पुढे आलं असून, या डॉक्टर महाशयांनी महाराष्ट्रातल्या १४ डॉक्टरांसह आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे ओबीसी आरक्षण सोडतो आहोत, असं म्हटलं आहे. ही भूमिका जाहीर करताना त्यांनी आपण ओबीसी कोट्यातून एमबीबीएस झालो आहोत आणि त्यानंतर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षण शुल्क अथवा इतर शुल्क भरण्यास सक्षम आहोत म्हणून, आरक्षणातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. वास्तविक, ज्या डॉ. राहुल घुले नावाच्या तथाकथित ओबीसी डॉक्टरने ही घोषणा केली आहे, त्यांनी सर्वप्रथम ओबीसी म्हणून आरक्षण घेऊन जे एमबीबीएस केलं आहे, ते एमबीबीएस आधी त्यांनी त्यागून द्यावं; कारण ते डॉक्टर झाल्याचा बेसच मुळात आरक्षण आहे. २००८ ला आरक्षण घेऊन एमबीबीएस होणारा हा डॉक्टर, अवघ्या पंधरा वर्षांमध्ये इतका सक्षम कसा होतो की, तो जाहीरपणे ही भूमिका मांडतो. या डॉक्टरची मुलं अजूनही शालेय जीवनात शिकत असतील! परंतु, तो आरक्षण सोडण्याची भाषा करतो. याचा अर्थ या डॉक्टरची ही स्वतंत्र बुद्धी नाही. शिवाय या डॉक्टरच्या नेतृत्वाखाली जे भरकटलेले इतर डॉक्टर सामील झाले आहेत, त्यांचं एकदा वैचारिक आणि बौद्धिक कनेक्शन तपासायला हवं! वास्तविक, ज्या डॉक्टरने हे नेतृत्व केले आहे, ते डॉक्टर राहुल घुले अनेक वादग्रस्त बाबींमध्ये प्रख्यात आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षण मधून स्वतः आरक्षण घेतलं आणि त्यानंतर या डॉक्टरने मुंबईतल्या एका मोठ्या सरकारी हॉस्पिटल मधून आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. पण अवघ्या सहा वर्षाच्या काळातच या डॉक्टरने ‘वन रुपी’ नावाचं क्लिनिक मुंबईतील अनेक लोकल रेल्वे स्टेशनवर सुरू केलं. अवघ्या एक रुपयात सुरू झालेल हे क्लिनिक त्यांना भारत सरकारच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर नेमकी जागा कशी मिळते, त्यासाठी त्यावर एक रुपया फी कशी आकारतात, हे सगळेच गौडबंगाल आहे. त्यानंतर हे वनरुपी क्लिनिक चालले की चालले नाहीत याबद्दल कोणतीही स्पष्टता आली नाही परंतु आता मुंबईच्या लोकल रेल्वे स्टेशनवर ही ‘वन रुपी’ क्लिनिक सक्रिय मात्र दिसत नाही. यावलट या डॉक्टरने २०२१ मध्ये झोपेच्या ३० गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्यावेळी ठाणे महापालिकेच्या “आपला दवाखाना” या योजनेअंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, असं सांगून त्यात मात्र आपली फसगत झाल्याचं सांगून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हेही स्पष्ट आहे. डॉ. राहुल घुले या तथाकथित ओबीसी व्यक्तीच्या नेतृत्वात जे इतर १४ डॉक्टर महाराष्ट्राचे सामील आहेत, त्यांच्या एकूणच वैचारिक बांधिलकीला तपासण्याची गरज आहे. कारण, या डॉक्टरांनी सामाजिक विषमता निर्मूलना चा मार्ग असलेले सामाजिक आरक्षण हे आर्थिक उत्थानाचा मार्ग समजून आपली आर्थिक प्रगती झाल्यामुळे ओबीसी आरक्षणातून बाहेर पडण्याची भूमिका घेत असल्याची अतिशय लबाडीची ही भूमिका घेतली आहे. वास्तविक सामाजिक आरक्षण म्हणजे सामाजिक दुर्बलता असलेल्या प्रवर्गांनाच मिळते. या डॉक्टरच्या पाल्यांना किंवा मुलांना जेव्हा समाज व्यवस्थेत कुठल्यातरी प्रतिनिधित्वासाठी बाहेर पडावं लागेल, तेव्हा, त्या डॉक्टरच्या पाल्यांविषयी व्यवस्था नेमका काय विचार करेल, हे आधी या डॉक्टर महाशयांनी समजून घेणे गरजेचे आहे. केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला बळ देण्यासाठी या तथाकथित १४ ओबीसी डॉक्टरांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देण्याची स्टंटबाजी करून ओबीसी आरक्षण सोडत असल्याची भूमिका घेतली. वास्तविक, त्यांना आरक्षण नको असेल तर ते त्यांनी त्यांच्या पाल्यांसाठी घेऊ नये. त्यांच्या आर्थिक शक्ती एवढ्या प्रचंड वाढल्या असतील, तर त्यातून  त्यांनी समाजाच्या काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण करावे. इतपत जर त्यांची क्षमता असेल तर त्यांनी हे जरूर करावं. परंतु, समाज घटकातील इतर लोकांना अडचण होईल अशा भूमिका या तथाकथित ओबीसी डॉक्टरांनी घेऊ नयेत. वास्तविक, ओबीसींच्या आरक्षणाला क्रिमिलियर नावाचं ग्रहण आधीच लावून ठेवलेले आहे. त्यात अशा प्रकारच्या भंकस प्रवृत्ती समोर येऊन ओबीसी आरक्षणावर प्रहार करत असतील, आणि अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाच्या बाजूने उभ्या राहत असतील, तर या प्रवृत्तींची निंदा किंवा निषेध निश्चितपणे करायला हवा.

COMMENTS