नागपूर ः गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागावाटपांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र नागपूर येथे रामगिरीवर मुख्यमंत्री एकनाथ
नागपूर ः गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागावाटपांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र नागपूर येथे रामगिरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. पुढील दहा दिवसांत 10 तारखेपर्यंत जागावाटप चर्चा पूर्ण होईल. पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जाहीर करतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
काही जागांबाबत चर्चा झाली. यात कोणी कुठलीही आकडेवारी मांडली नाही. जिथे जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जागा किती कोणाला मिळाव्या हे महत्त्वाचे नाही. राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी महायुतीचे डबल इंजिनचे सरकार हवे आहे. जागेचा आग्रह नाही, जिंकण्याला प्राथमिकता आहे. सोबत 13 मित्रपक्ष आहेत. त्यांचाही विचार करणार आहोत. विदर्भातील विकासकामांबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देणार आहे. यानंतर महायुतीच्या घटकपक्षाबद्दल कोणी वाद निर्माण होईल असा बोलघेवडेपणा करु नये. तशा सूचनाही भाजपचे सर्व पदाधिकारी, प्रवक्ते व कार्यकर्त्यांना दिल्या आहे. यानंतर कोणी असे केले तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. बावनकुळे यांनी यावेळी माध्यमांना जागावाटप किती जागांवर एकमत झाले, यावर बोलण्यास नकार दिला, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर एकमत झालं आहे. या बैठकीत भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळतील. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा देण्याचे मान्य झाले, याची माहिती समोर आलेली नाही. पुढील बैठकीत उर्वरित 115 जागांवर निर्णय होणार आहे.
आणखी दोन तीन बैठकांच्या फेर्या होणार – जागावाटप निश्चित करण्यासाठी आणखी 2-3 बैठकांच्या फेर्या होतील. नागपुरात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, 2019 च्या निवडणुकीत आम्ही 54 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्हाला काँग्रेसचे तीन आमदार आणि तीन अपक्षांचा पाठिंबा असल्याने आमची ताकद वाढत आहे. या विधानसभा निवडणुकीत आम्ही 60 जागांची मागणी करणार आहोत. महायुती सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 मध्ये संपणार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये 105 आमदारांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
COMMENTS