चिचोंडी पाटील येथे महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनअहिल्यानगर ः नवी तंत्रज्ञान एआयविषयी अनेकांनी मते मांडली. त्यादृष्टीने लवकरच रयतच्या सर्व शाळ

चिचोंडी पाटील येथे महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन
अहिल्यानगर ः नवी तंत्रज्ञान एआयविषयी अनेकांनी मते मांडली. त्यादृष्टीने लवकरच रयतच्या सर्व शाळांमधून एआय तंत्रज्ञान शिकविण्याची सुरूवात करणार असल्याची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी चिंचोडी पाटील येथे दिली. रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील, अहिल्यानगर येथील ’न्यू इंग्लीश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालया’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, उत्तर विभागाचे चेअरमन आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, संस्थेला नेहमीच मदत करणारे महेंद्रशेठ घरत, बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, नवनाथ बोडखे, फाळके, शेजारच्या तालुक्याचे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, सल्लागार समितीचे सभासद महादेव आबा कोकाटे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खा. शरद पवार म्हणाले की, एका नव्या वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी आपण या ठिकाणी उभे आहोत. आज या कार्यक्रमाला यावं, यासाठी महादेव आबा कोकाटे आणि त्यांच्या सहकार्यांचा अतिशय आग्रह होता. खरं म्हणजे आग्रह नव्हता, हट्ट होता. त्यामुळेच आज आम्हा सगळ्यांना याठिकाणी येता आलं. इथं आल्यानंतर ही जी वास्तू आहे ती पाहिल्यानंतर त्यामागे ग्रामस्थांचा आग्रह काय होता? ते हे वास्तू पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळतं. मला आनंद आहे की, इथे आल्यावर तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या वास्तूचं उद्घाटन झालं असं मी याठिकाणी जाहीर करतो. रयत शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य हे आहे की, सामान्यातल्या सामान्य लोकांच्या मदतीने ठिकठिकाणी याची कामे चालवतात. अनेकांना माहित नसेल कर्मवीर भाऊराव पाटलांनी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शून्यातून कामाची सुरुवात केली. नव्या पिढीला ज्ञानाच्या महासागरामध्ये आणलं पाहिजे, हि भूमिका अण्णांच्या मनात आली. त्यामधून ’रयत शिक्षण संस्थे’चा जन्म झाला. आज लाखो मुलं- मुली शिकून गेली, लाखो मुलं- मुली शिकताहेत. हजारो शाखा आहेत. त्या हजारो शाखांमध्ये अध्यापक असतील, हितचिंतक असतील, विद्यार्थी असतील एक प्रचंड समूह अण्णांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामध्ये उभं करण्यासाठी आपण यशस्वी झालो. मगाशी बोलत असताना सांगितलं की, हि वास्तू लोकांच्या मदतीने बांधली. हि मदत करणारे स्थानिक होते असं नाही. स्थानिक होते, पण रामशेठ ठाकूर! जिल्हा त्यांचा रायगड. अशा दूरच्या लोकांनी सुद्धा त्याला हातभार लावला. हे रामशेठ ठाकूर कोण होते? ते आमच्याबरोबर खासदार होते. पण त्यांचा राजकारणात फार इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्ट समाजकारणामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला दरवर्षी कमीत कमी 5 कोटी हि रक्कम न मागता देतात असेही यावेळी खा. शरद पवार यांनी सांगितले.
इमारतीसाठी अनेक दात्यांनी दिली 3 कोटींची देणगी
चिचोंडी पाटील या गावातील रयत शिक्षण संस्थेच्या 21 वर्ग खोल्यांचे 3 मजली या इमारतीच्या कामासाठी अनेक दात्यांनी तब्बल 3 कोटी रुपयांची देणगी वेगवेगळ्या स्वरूपात दिली आहे. यावेळी स्कूल कमिटीच्या वतीने पवार साहेबांचा सन्मान करताना आबासाहेब कोकाटे सर सर्व सदस्य, व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शरद पवार व उपसरपंच यशोदाताई कोकाटे व सदस्य पवार साहेबांचा सन्मान करताना उपस्थित होते. स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे, व सरपंच शरद पवार यांनी सर्व मान्यवर यांचे स्वागत करून सर्व देणगीदारांचे आभार मानले.
COMMENTS