Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या या गावांचा सन्मान

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा : जिल्हाधिकारी सालीमठअहिल्यानगर : लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतद

सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला
राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीची संजीवनीला पसंती

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा : जिल्हाधिकारी सालीमठ
अहिल्यानगर : लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, आकाश दहाडदे आदी उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, ऊसतोड कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्याने गेल्या वर्षभरात २ लाख मतदारांची नोंदणी केली असून, यामध्ये ४५ हजारांहून अधिक युवा मतदार आहेत.
विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चार टक्के मतदानवाढ करण्यात यश आले. स्वीप उपक्रमांचे यात मोलाचे योगदान आहे. नागरिक, विविध संस्था, महाविद्यालये आणि शाळांनी सहकार्य केल्याने हे यश संपादन करता आले. यापुढेही सर्वांनी मतदार जागृती उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमात झालेला सन्मान हा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, ग्रामीण भागातील मतदार, मतदार नोंदणी आणि जागृतीत महाविद्यालयांचा सहभाग यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली. नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत अशाच पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, मिशन ७५ उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे चांगले कार्य केले. मतदार जागृतीचे अनेक उपक्रम शहरात राबवण्यात आले. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ९० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेऊन प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील स्वीप उपक्रमांची दखल देश पातळीवर घेतली गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना राहुल पाटील यांनी मतदार दिन कार्यक्रमाची माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाल्याने २०११ पासून मतदार जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्रीकांत बिडवे, पत्रकार महेश देशपांडे, पारनेर ग्रंथालयाचे विजय डोळ आणि पूजा खेडकर या विद्यार्थिनीने यावेळी मनोगत व्यक्त केले.
सर्वाधिक मतदान करणाऱ्या गावांचा सन्मान:
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये सर्वाधिक मतदान केलेल्या जिल्ह्यातील गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक ९५ टक्के मतदानाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अकोले मतदार संघातील घाटघर, संगमनेर-गोडसेवाडी, शिर्डी-खडकेवाके, कोपरगाव-हिंगणी, श्रीरामपूर-दिघी, नेवासा-मुरमे, शेवगाव-विजयपूर, राहुरी-मल्हारवाडी, पारनेर-गाडीलगाव, अहमदनगर शहर -बोल्हेगाव, श्रीगोंदा-गार, तर कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघातील कोरेगाव या गावांना विधानसभा मतदार संघस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव:
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, अरुण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, मिलिंद वाघ, गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव डॉ. किरण मोघे, सदस्य महेश देशपांडे, आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, सखाराम मेहेत्रे विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा कदम, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक संजय शिंदे, प्रशांत सुरसे व नंदकुमार नेमाणे यांचा गौरव करण्यात आला.
नवमतदार नोंदणी, स्वीपमध्ये सहकार्य करणाऱ्या महाविद्यालयांचा गौरव:
विधानसभा निवडणुकीत नवमतदार नोंदणी आणि स्वीप उपक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा महाविद्यालय, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय, लोणी, एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव, रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, राहुरी, न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, पारनेर, न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, अहमदनगर, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा, व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत या महाविद्यालयांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आणि स्वीप उपक्रमात सहभागी व्यक्ती व संस्थांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, मतदार दिनानिमित्त मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. गुलमोहर रोडवरील आनंद शाळेपासून रॅलीला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली.

COMMENTS