अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे
अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. शेती हा आपला कणा असून शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केले.
सायन्सस्कोर मैदान येथे आजपासून सुरू झालेल्या कृषी विकास परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, कृषी सह संचालक प्रमोद लव्हाळे, जिल्हा शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, भारत कृषिप्रधान असल्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याशी प्रत्येकजण जुळलेला आहे. शेतीमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जावे लागते. अशावेळी पूरक व्यवसाय मदतनीस ठरतात. बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्थिर असतो. यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेती उद्योगधंद्यांचे नियोजन करण्यात येईल. विद्यापीठातील पडिक जमिनीवर चारा लागवड व्हावी. जेणेकडून जमीनही उपजाऊ राहील आणि शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी मदत होईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

कृषी विकास परिषद व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळेल. याच धर्तीवर अन्य जिल्ह्यातही अशा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊ. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतीमध्ये मनुष्यबळाला पर्याय नाही. नवीन एआय तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर ठरावी, अल्पावधीत अधिक उत्पन्न घेता यावे यासाठी नवीन तंत्रज्ञान मदतनीस ठरेल. कृषी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट वाण निर्मितीसाठी प्रयोग करण्यात यावे. शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

खासदार श्री. डॉ. बोंडे यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. नव तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित मालावर प्रक्रिया करून बाजारात विक्री करण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. या प्रदर्शनीतील सेंद्रिय शेतीच्या बाबतीतील प्रशिक्षण, संत्रा पीक व्यवस्थापन, ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षित फवारणी, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण या विषयावरील मार्गदर्शन शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे -पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संत्रा पीक व्यवस्थापन दिनदर्शिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी मंत्री श्री . ॲड. कोकाटे यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सला भेटी देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला. येथे कृषी यंत्रे, अवजारे , धान्य, गृहपयोगी वस्त , मिलेट्स उत्पादने, बांबूच्या वस्तू, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, सेंद्रिय धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल्स लावण्यात आले आहेत. आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी संचालन तर आभार राहुल सातपुते यांनी मानले.

जिल्हास्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापणार
शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना, तसेच शेतकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सूचनांसाठी जिल्हास्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षाला प्राप्त सूचना 24 तासाच्या आत मंत्रालयात कळविण्यात येईल, अशी माहिती मंत्री ॲड. कोकोटे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या हितासाठी विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष कृषी मंत्री राहतील. समितीची तीन महिन्यातून एकदा बैठक घेण्यात येईल. यावेळी शिवारफेरीही काढण्यात येईल. अशा बैठकीतून जिल्ह्याचा डाटा तयार होणार असून राज्याचे धोरण ठरविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण आणि इतर निविष्ठांसाठी सध्या असणारी लॉटरी पद्धत बंद करण्यात येईल. यात सुटसूटीतपणा यावा, यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी दिला जाईल. तसेच डीबीटी योजना बंद होणार असून डीबीटीमधून बाद झालेल्या योजनाही पुन्हा डीबीटीमध्ये आणल्या जातील.

शेतपिकांच्या उत्पादन वाढीसाठी मल्चिंग पेपरचा उपयोग वाढविण्यात येणार आहे. यासाठी गुणवत्ता तपासून सर्व मल्चिंग पेपरला अनुदान देण्यासाठी सुधारणा करण्यात येतील. मल्चिंग पेपरचा दर्जा तपासण्यासाठी कृषी विभागाकडे तपासणी यंत्रे देण्यात येणार आहे. शेतीची उत्पादक वाढविण्यासाठी नवीन मंच तयार करण्यात येईल. यातून तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांकडून शेतीबाबत मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाईल. त्याबरोबरच कृषी विद्यापीठांनी संशोधनाला गती देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रयोग यशस्वी करावेत, तसेच अद्यावत लॅब उभारावी.
किटकनाशकांचे दर ठरविण्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे नियंत्रण नाही. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. याबाबतीत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. ठिंबक सिंचनाचे राज्याचे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत आधीच राज्यस्तरावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच सफेद मुसळी उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन आधारीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्यात येईल.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. शेतीला कुंपन घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्पादन देईल अशी कुंपन व्यवस्था करण्यात येईल. बांधावर बांबू, काटेसावर, करवंदाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यामुळे कुंपनाच्या व्यवस्थेसाबतच पुरक उत्पन्नाची सोय होणार असल्याचे ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके यांनी मनोगत व्यक्त केले.
COMMENTS