मुंबई/प्रतिनिधी ः विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीने नागपूर, आणि औरंगाब
मुंबई/प्रतिनिधी ः विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीने नागपूर, आणि औरंगाबादमध्ये जागा खेचून आणली तर, कोकणात मात्र भाजपने विद्यमान आमदाराला मात दिली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी तिसर्या फेरीअखेर देखील आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना मात देत ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. मात्र भाजपला आपला नागपुरातील गड राखता आलेला नाही. नागपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत. औरंगाबादमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगत वाढली होती, औरंगाबादमधून आघाडीचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. तर अमरावतीमध्ये रात्री उशीरापर्यंत चित्र स्पष्ट झालेले नव्हते. चौथ्या फेरीत आघाडीचे धीरज लिंगाडे विजयाच्या दिशेने आगेकुच करत त्यांनी आघाडी घेतली होती.
कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत तब्बल 20 हजार 800 पेक्षा अधिक मते मिळवत विजय मिळवला आहे. तर शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळावत त्यांनी विजय नोंदवला आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे पहिल्या फेरीतच आघाडीवर होते. त्यांनी विजयासाठी लागणारा आकडा हा पहिल्याच फेरीत गाठल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे भाजपचे होमग्राऊंड समजल्या जाणार्या नागपुरात मात्र महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना एकूण 14069 मतं पडली आहेत. तर भाजपचे नागो गाणार यांना 6366 मत पडली असून ते दुसर्या क्रमांकावर आहेत. तर राजेंद्र झाडे यांना 2742 मत पडली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदार संघात भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना मात देत विजय संपादन केला.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यभर गाजली. त्यामुळे या निवडणुकीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे पहिल्याच फेरीत विजयी मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे मतमोजणीची दुसरी आणि तिसरी फेरी मोजण्यात आली. यामध्ये तिन्ही फेर्यामध्ये तांबे यांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. मात्र रात्री उशीरापर्यंत निकाल जाहीर झाला नव्हता. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांना 15 हजार 784 मते तर, शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाल्याचे पहायला मिळाले. दुसर्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांना 31 हजार 009 मते तर शुभांगी पाटील यांना 16 हजार 316 मते मिळाली. यामध्ये दुसर्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांना 14 हजार 693 मतांची आघाडी घेतली, तर 5445 मते बाद झाल्याचे पहायला मिळाले. मात्र मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे तिसरी फेरीचे मते मोजण्यात येत होती.
विजयी उमेदवार पक्ष मतदारसंघ
ज्ञानेश्वर म्हात्रे – भाजप (कोकण शिक्षक मतदारसंघ)
सुधाकर आडबाले – ‘मविआ’ (नागपूर शिक्षक मतदारसंघ)
विक्रम काळे -‘मविआ’ (मराठवाडा पदवीधर मतदारसंघ)
तिसर्या फेरीअखेर आघाडी
धीरज लिंगाडे – ‘मविआ’ (अमरावती पदवीधर मतदारसंघ)
सत्यजित तांबे-अपक्ष (नाशिक पदवीधर मतदारसंघ)
नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार नव्हताच ः बावनकुळे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा विजय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलतांना भाजप नेते बावनकुळे म्हणाले की, नागपूरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. तो पराभूत उमेदवार भाजपचा नव्हता. यावर विरोधी पक्षाने हुरळून जाऊ नये, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.
भाजपला नडला जुन्या पेन्शनचा मुद्दा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जुनी पेन्शन देता येणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्याचे पडसाद या निवडणुकीत दिसून आले. जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यासाठी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, तसेच यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान विधिमंडळावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला होता. त्याचाच फटका या निवडणुकीत भाजपला बोलले जात आहे.
COMMENTS