अहमदनगर/प्रतिनिधी - नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्षपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यानंतर नवे
अहमदनगर/प्रतिनिधी – नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्षपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यानंतर नवे अध्यक्ष अग्रवाल यांनी बँकेचे प्रशासक एम. के. रेखी यांच्याकडून पदभार स्वीकारला. नगर अर्बन बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृति आराखडा तयार केला असून, तो प्राधान्याने राबवण्यात येणार असल्याचे नवे अध्यक्ष अग्रवाल यांनी निवडीनंतर स्पष्ट केले. संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या नगर अर्बन बँकेच्या जवळपास एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहकार मंडळाने एकहाती वर्चस्व राखले. त्यानंतर नगर अर्बन बँकेच्या सभागृहात बुधवारी झालेल्या विशेष सभेमध्ये नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अग्रवाल व उपाध्यक्षपदी दीप्ती गांधी यांची निवड एकमताने करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या संचालक मंडळाची सभा बँकेच्या सभागृहात झाली. या निवडीच्यावेळी अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून शैलेश मुनोत व अनुमोदक म्हणून दिनेश कटारिया यांनी प्रस्ताव ठेवला तर उपाध्यक्षपदासाठी राहुल जामगावकर सूचक व कमलेश गांधी अनुमोदक होते. यानंतर अध्यक्षपदी अग्रवाल व उपाध्यक्षपदी गांधी यांची सर्वानुमते निवड झाली. दोन्ही पदाधिकार्यांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेत आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. निवडीनंतर बँकेच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
COMMENTS