शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान या चतुसूत्रीचे प्रतिक असणारे, एका अदृष्य असणाऱ्या सिंहासह एकूण चार सिंहाचे चिन्ह असलेले भारताचे राष्ट्रीय प्रति
शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान या चतुसूत्रीचे प्रतिक असणारे, एका अदृष्य असणाऱ्या सिंहासह एकूण चार सिंहाचे चिन्ह असलेले भारताचे राष्ट्रीय प्रतिक चिन्ह जे नव्या संसद भवनावर लावण्यात येणार आहे, त्यात बदल करण्यात आला आणि देशातून चौफेर टीकेची झोड उठली. या टिकेच्या केंद्रीभूत असणारा मुद्दा म्हणजे एखाद्या कलात्मक बाबीचे सौंदर्यशास्त्र नेमकी काय भूमिका बजावते, हेच अधोरेखित होते. तसे तर सामान्य माणसाचा आणि सौंदर्यशास्त्राचा तात्विक अंगाने एकमेकांशी काहीही संबंध नसतो, असे ढोबळमानाने म्हणतात. परंतु, व्यावहारिक जीवनात सौंदर्यशास्त्राशिवाय सामान्य माणसाचे पानही हलत नाही. सामान्य व्यक्ती हा जीवनमंचावरचा अभिनेता असतो, असे जरी शेक्सपिअर म्हणत असला, तरी अभिनयाचे गुण असल्याशिवाय व्यक्ती चांगला अभिनेता होत नाही. अर्थात, हे गुण निरीक्षण, मार्गदर्शन आणि सरावाने मिळवता येतात. सामान्य माणसापेक्षा अभिनेता हा कोणत्याही प्रसंगी असणारी चेहऱ्याची वेगवेगळी ठेवणं तो आपल्या चेहऱ्यावर अभिव्यक्त करतो. काल भारताच्या राष्ट्रीय प्रतिक चिन्हाच्या स्वरूपात केलेला बदल हा देशाच्या जनतेला रूचलेला नाही. कारण मुळ राष्ट्रीय बोधचिन्ह हे सारनाथ येथील सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत इसवी पूर्व २८० मध्ये उभारलेल्या सिंहांच्या प्रतिकालाच राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून देशाने सन १९५० मध्ये स्विकारले. सारनाथ येथील या राष्ट्रीय बोधचिन्हात असणारे अशोकचक्र देखील १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या राष्ट्रीय ध्वजात समाविष्ट करण्यात आले. मात्र, काल या राष्ट्रीय बोधचिन्हातील अभिव्यक्तीत बदल घडवून आणल्याने देशातील जनतेत एक सुप्त रोष निर्माण झाला. सारनाथ येथील अशोक स्तंभ म्हणून ओळखले जाणाऱ्या राष्ट्रीय बोधचिन्हातील सिंहाची अभिव्यक्ती ही हिंसक अथवा आक्रमक नव्हती. परंतु, काल केलेल्या बदलात या राष्ट्रीय बोधचिन्हाची अभिव्यक्ती ही आक्रमक आणि हिंसक दिसत असल्याचा आरोप भारतीयांकडून होत आहे. मुळ सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहऱ्यावरील भाव सौम्य पण रूबाबदार आहेत. परंतु, नवा सिंह अत्यंत हिंसक आणि उग्र स्वरूपाचा दिसतो. देशातील काही राजकीय पक्ष देखील यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून यात बदल करण्याची मागणी करित आहेत. वास्तविक, कोणतेही शिल्प उभारताना शिल्पकाराला शरिरशास्त्राचा अभ्यास असावा लागतो. जसे एखादे मुल रडताना, हसताना, आनंदी असताना, घाबरलेला अशा वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या चेहऱ्यावर असणारे हावभाव बदलतो. हे हावभाव पाहूनच कोणतीही व्यक्ती त्या बाळाची त्यावेळची मनोवस्था काय आहे, याचा अंदाज बांधू शकते. शिल्पकाराला चेहऱ्यावरच्या त्या भावमुद्रा एखादी बाळाची शिल्पकृती निर्माण करताना त्या मूर्तीतून अभिव्यक्त करता आल्या पाहिजेत. ते कलाकाराचे कसब नव्हे तर प्राविण्य असते. भारताचे राष्ट्रीय बोधचिन्हाची नव्याने झालेली ही निर्मिती चारही सिंहाना आक्रमक आणि हिंसक पद्धतीने रेखाटल्याचा आरोप केला जात आहे. भारत हा एक संस्कृतीसंपन्न देश आहे. सिंधू संस्कृती, मोहनजोदरो आणि हडप्पा संस्कृती, त्यानंतर आलेल्या महावीर आणि बुद्ध संस्कृती व, दहाव्या शतकात शंकराचार्य यांनी उभी केलेली ब्राह्मण संस्कृती जी ब्रिटिश आगमनानंतर हिंदू संस्कृतीचे रूप घेऊन उभी राहिली. संस्कृती ही परंपरा बनून समाजात जीवंत राहते. तिचे अर्थ हे संचित असतात. त्यामुळे अभिव्यक्तीत केलेल्या बदलातून तिचे संचित अर्थ बदलतात. कलाकाराने या बाबी जपणे गरजेचे असते. कारण देशाच्या अनुरूप मनोभूमिका शिल्पकार समजून घेण्यात अपयशी ठरला, तर तो एकूणच त्याच्या समर्पण आणि शिल्पसाधनेत कमी पडतो, असे म्हटले जाते. अर्थात, कोणत्याही सांस्कृतिक प्रतिकांशी छेडछाड करताना कला, इतिहास, शरिरशास्त्र, लोकांचं मानसशास्त्र हे जवळून अनुभवायला हवे. कोणताही शिल्पकार हा आधी कलेचा साधक असतो नंतरच तो निर्माता असतो. साधनेशी विपरीत निर्मिती केली की वाद उभे राहतात. अर्थात, कलाकाराने हे टाळायला हवे!
COMMENTS