Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत :शिवतारे ; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी

मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी, त्याला नाराजीनाट्याचे ग्रहण लागतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी

भीषण अपघात,पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू | LOKNews24
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित
कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा : मुख्यमंत्री

मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी, त्याला नाराजीनाट्याचे ग्रहण लागतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी नोंदवल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी देखील कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हे म्हणून संताप व्यक्त केला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.शिवसेनेतून तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
राजेंद्र गावित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजातला एकही आमदार दिलेला नाही. गेल्या सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते. त्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. या समस्यांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर नक्कीच एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता, आणि असे वाटत आहे की जी एक जागा रिक्त आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने काही जुन्या, तर काही नवीन नेत्यांना संधी दिली आहे. नवीन चेहर्‍यात संधी मिळण्याची भोंडेकर यांना आशा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केली. पद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गटातून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर मात्र एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे देखील समजते. त्यामुळे नाराजी व्यक्त केलेल्या आमदारांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रध्दा आणि सबुरी ठेवणार्‍यांनाच भविष्यात शिवसेनेकडून मंत्रीपदे मिळतील, अशी राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नागपुरात असून मुनगंटीवार अधिवेशनाला अनुपस्थित
मंत्रिमंडळातून वगळल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. कारण नागपुरात असूनही मुनगंटीवार यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे टाळले आहे. त्यामुळे नाराजीच्या चर्चांना चांगलेच उधाण आले. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना नाराजीच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी, त्यांच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाबद्दल सांगितले होते असा दावा देखील त्यांनी केला आहे.

COMMENTS