मुंबई ः बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभी
मुंबई ः बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या वांद्रे स्थित घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना अटक केली होती. यापैकी अनुज थापन याने बुधवारी तुरुंगात चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तुरुंगातील कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला लगतच्या ॠढ रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच्या त्याच्या पंजाब येथून मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्या मृत्यूमुळे तुरुंगातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलमानच्या घरावर गत 14 एप्रिल रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास 2 दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या सलमानच्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपला तपास सुरू केला होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
COMMENTS